नवी मुंबई - बलात्कार प्रकरणी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमित शेलार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला पोलीस कर्मचारी असून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचे तिचे म्हणणे आहे. यानुसार सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला पोलीस कर्मचारी असून उपनिरीक्षक अमित शेलार यांच्याकडून लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार आयुक्त संजय कुमार यांनी महिला सहाय्य्यता कक्षाच्या वरिष्ठ निरीक्षक मीरा बनसोडे यांच्याकडे तपास सोपवला होता. तपासाअंती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमित शेलार यांच्यावर सीबीडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेलार हे 2010 मध्ये पोलीस नाईक पदावर असताना तत्कालीन पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. त्यावेळी शेलार यांनी ज्यूसमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार करताना व्हिडीओ बनवला. त्यानंतर मागील दोन वर्षात हा व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचा आरोप आहे. या बाबी पडताळून शेलारवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप अटक करण्यात आलेली नाही.