नवी मुंबई : पनवेल येथे झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांना अटक केली असून ते बेकरी कामगार आहेत. रात्रीच्या वेळी ते परिसरातील गावांमध्ये चोरी करायचे. बुधवारी पहाटे ते चोरी करून पळून जात असताना एका तरुणाने त्यांचा पाठलाग केल्याने त्यांनी चाकू व कुऱ्हाडीने त्याची हत्या केली होती.
पनवेलच्या शिवकर गावात घडलेल्या या घटनेने परिसर हादरला होता. विनय पाटील (१९) याच्या घरात चोरी करून पळणाऱ्या चोरट्यांचा त्याने पाठलाग केला असता निर्मनुष्य ठिकाणी चोरटयांनी त्याची हत्या करून पळ काढला होता. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याद्वारे गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे यांनी गुन्हे शाखा कक्ष ३ चे वरिष्ठ निरीक्षक विश्वनाथ कोळेकर, सहायक निरीक्षक सागर पवार, ईशान खरोटे, उपनिरीक्षक सुशील मोरे, सचिन सुभे आदींचे पथक केले होते. या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांची माहिती मिळवून तिघांना ताब्यात घेतले होते. चौकशी त्यांनी विनय याच्या हत्येची कबुली देताच त्यांना अटक केली असल्याचे उपायुक्त अमित काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दिनेशकुमार सरोज (२०), वीरेंद्रकुमार सरोज (२१) व चंद्रशेखर लालजी (२२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघेही उसर्ली गावचे राहणारे असून मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. माही वर्षांपासून ते परिसरातल्या बेकरीवर काम करत आहेत. यादरम्यान ते रात्रीच्या वेळी परिसरात चोऱ्या देखील करत होते. बुधवारी पहाटे देखील ते गावामध्ये चोरीसाठी गेले असता चोरी करून पळून जाताना विनय पाटील (१९) याला त्यांची चाहूल लागल्याने त्याने पाठलाग केला असता त्याची हत्या करून मुंबई पुणे महामार्गावरील पुलाखाली मृतदेह टाकून पळ काढला होता.