"नीट"च्या डमी उमेदवार विद्यार्थिनीवर गुन्हा; बेलापूरमधील घटना
By सूर्यकांत वाघमारे | Published: May 6, 2024 05:55 PM2024-05-06T17:55:51+5:302024-05-06T17:56:46+5:30
परीक्षा देण्यासाठी आली राजस्थानवरून
सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : रविवारी झालेल्या नीटच्या परीक्षेत बेलापूर येथील केंद्रावर डमी उमेदवार मिळून आली आहे. परीक्षार्थी विद्यार्थिनीच्या वतीने ती परीक्षा देण्यासाठी राजस्थान येथून आली होती. याप्रकरणी तिच्यावर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा रविवारी झाली. बेलापूर येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या केंद्रावर देखील हि परीक्षा घेण्यात आली. त्यानुसार दुपारी परीक्षा सुरु असताना परीक्षा केंद्रावर नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत फोन आला होता. त्यामध्ये मयुरी पाटील नावाच्या विद्यार्थिनीवर संशय व्यक्त करून परीक्षा झाल्यावर तिची चौकशी करण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार परीक्षा संपल्यानंतर सदर विद्यार्थिनींची बायोमॅट्रिक चाचणी घेतली असता ती मूळ उमेदवार नसून डमी उमेदवार असल्याचे समोर आले. अधिक चौकशीत तिने तिचे नाव निशिका यादव (२०) असून मूळची राजस्थानची असल्याचे तसेच वैद्यकीय शिक्षण घेत असल्याचे सांगितले.
त्यावरून निशिका हि उमेदवार मयुरी पाटील हिची डमी उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी विद्यापीठामार्फत सीबीडी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून त्याद्वारे निशिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला समजपत्र बजावून सोडून देण्यात आले असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.