Crime News: साहिलच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, तिघे अल्पवयीन, भेटीसाठी बोलावून काढला काटा
By सूर्यकांत वाघमारे | Published: October 20, 2022 06:57 PM2022-10-20T18:57:54+5:302022-10-20T18:58:47+5:30
Crime News: कोपर खैरणे येथे अल्पवयीन मुलाच्या हत्येची घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यातले तिघे अल्पवयीन आहेत. साहिल सोबतच्या वादातून त्यांनी त्याला भेटीसाठी बोलावून काटा काढल्याचे समोर आले आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : कोपर खैरणे येथे अल्पवयीन मुलाच्या हत्येची घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यातले तिघे अल्पवयीन आहेत. साहिल सोबतच्या वादातून त्यांनी त्याला भेटीसाठी बोलावून काटा काढल्याचे समोर आले आहे.
कोपर खैरणे सेक्टर १५ येथे राहणाऱ्या साहिल गोळे (१७) याची डोक्यात दगड घालून व पोटावर धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली होती. बारावीचे शिक्षण घेणारा साहिल हा एका कंपनीत रात्रीपाळीवर काम देखील करायचा. मंगळवारी रात्री तो कामावर गेला असता, हजेरी लावून पुन्हा कोपर खैरणेत आला होता. दरम्यान त्याचे आईसोबत बोलणे झाले असता त्याने तो कामावर असल्याचे सांगितले होते. मात्र बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह सेक्टर २३ येथील मैदान लगत आढळून आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असता, अधिक चौकशीत पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यात तिघे अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधार गृहात रवानगी केली जाणार आहे. तर चौथ्या साथीदाराचे नाव संकेत उर्फ सन्नी पवार (२०) असून तो देखील त्याच परिसरात राहणारा आहे. त्यांचा साहिल सोबत वाद झाला होता असे समोर आले आहे. या वादातून मंगळवारी रात्री ते समोरासमोर आले असता, चौघांनी मिळून साहिलचा कायमचा काटा काढला. यामध्ये इतर काही कारण आहे का ? व इतर कोणाचा समावेश आहे का ? याचा अधिक तपास कोपर खैरणे पोलीस करत आहेत.