नवी मुंबई: वाहनचोरीच्या १९ हुन अधिक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी व त्याचा साथीदार पोलिसांच्या हाती लागला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्याने मेरठ व साकीनाका येथे कारवाई करून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. चौकशीदरम्यान अहमदनगर येथे चोरीचे वाहन घेऊन जाताना त्यांनी केलेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचीही बाब उघड झाली आहे.
नवी मुंबई पोलिसांपुढे वाहनचोरांचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असणाऱ्यांची माहिती मिळवून त्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न नवी मुंबई पोलिसांकडून सुरु आहेत. त्याच उद्देशाने गुन्हे शाखा पोलिसांकडून वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून गुन्हेगारांची माहिती मिळवली जात आहे. त्यासाठी उपायुक्त अमित काळे, सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या पथकाला सराईत गुन्हेगाराची माहिती मिळाली होती. त्याचा शोध घेण्यासाठी सहायक निरीक्षक निलेश पाटील, निलेश बनकर, गंगाधर देवडे, उपनिरीक्षक सचिन बाराते, नरेंद्र पाटील, प्रशांत कुंभार, अशोक खैरे, विश्वास पवार, सुमंत बांगर, बालाजी चव्हाण, दिपक पाटील, अतिश कदम, अजय वाघ आदींचे पथक करण्यात आले होते. त्यांनी उत्तर प्रदेशच्या मेरठ परिसरात सापळा रचला होता. यावेळी मोहम्मद फैज अकबर अली शेख (४८) हा पोलिसांच्या हाती लागला. चौकशीसाठी त्याला नवी मुंबईत आणले असता त्याचा साथीदार मोहम्मद शमीम शकी शेख (३५) याची माहिती समोर येताच त्यालाही साकीनाका येथून अटक करण्यात आली.
सखोल चौकशीत दोघांवरही १९ पेक्षा अधिक वाहनचोरीचे गुन्हे दाखल असून यामध्ये मुंबई, नवी मुंबईसह ठाणे, अहमदनगर पोलिसांना ते पाहिजे होते असेही समोर आले. शिवाय अहमदनगर येथे गतमहिन्यात ते एक कार चोरी करून पळत असताना दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झालेला असल्याचेही समोर आले. त्यांनी केलेले आठ गुन्हे उघडकीस आले असून त्यामधील तीन कार हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांनी चोरीच्या वाहनांची कुठे विल्हेवाट लावली याचाही अधिक तपास गुन्हे शाखा पोलिस करत आहेत.