गुन्हे प्रतिबंधात्मक जनजागृती अभियान
By admin | Published: August 3, 2015 12:08 AM2015-08-03T00:08:59+5:302015-08-03T00:08:59+5:30
नागरी सुरक्षितता त्याचबरोबर गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. नागरी सुरक्षेअंतर्गत गुन्हे
कळंबोली : नागरी सुरक्षितता त्याचबरोबर गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. नागरी सुरक्षेअंतर्गत गुन्हे प्रतिबंधात्मक अभियान हाती घेण्यात आले असून त्यामध्ये थेट जनतेला सहभागी करून घेण्यात आले आहे. परिमंडळ-२मध्ये कामोठे वसाहतीपासून या अभियानाला शनिवारी प्रारंभ झाला. यानिमित्ताने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी थेट रहिवाशांशी संवाद साधला.
प्रभात रंजन यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर अधिक भर दिला आहे. त्यांनी नागरिक व पोलीस यांच्यातील दरी कमी करण्याकरिता समन्वय साधण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नागरी सुरक्षेवर जोर देत असताना गुन्हेगारांवर नागरिकांच्या सहकार्याशिवाय वचक ठेवणे कठीण असल्याचे पाहून गुन्हे प्रतिबंधात्मक जनजागृती अभियान नव्याने सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत आदर्श रहिवासी सामाजिक संघाच्या सहकार्याने सेक्टर २१ मधील गुरुदेव हाईट्स या सोसाटीत बैठक झाली. पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी संवाद साधला.
पुणे येथील गुन्हेगार कामोठेत येऊन राहतो, आणि खबर लागत नाही कारण पोलीस व नागरिकांमध्ये सुसंवाद नाही, अशी खंत विश्वास पांढरे यांनी व्यक्त केली. आमच्याकडे मर्यादित मनुष्यबळ असल्याने काही आव्हान पेलण्यास निश्चित यंत्रणा कमी पडत असल्याचेही ते म्हणाले. आदर्श रहिवासी संघाचे अध्यक्ष वसंत गमरे, कार्यकारी सभासद रमेश म्हात्रे, उपाध्यक्ष अरविंद रावराने, देवंद्र पाटील यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)