सीवूडच्या गणेश मंडळावर गुन्हा, चौघांना शॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:29 PM2019-09-15T23:29:33+5:302019-09-15T23:30:20+5:30
नेरुळ येथील दुर्घटनेप्रकरणी संबंधित मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : नेरुळ येथील दुर्घटनेप्रकरणी संबंधित मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मंडळाकडून मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढतेवेळी मूर्तीची प्रभावळ विद्युत वायरीला लागून चौघांना शॉक लागला होता. सुदैवाने मुख्य विद्युत प्रवाह खंडित झाल्याने जीवितहानी टळली होती.
सीवूड येथील राजे शिव छत्रपती गणेशोत्सव मंडळावर नेरुळ पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरु वारी रात्री नेरूळ येथे ही दुर्घटना घडली होती. मंडळातर्फे स्थापना करण्यात आलेल्या १५ फूट उंचीच्या मूर्तीचे विसर्जन केले जात होते. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून ट्रॉली खेचली जात होती. दरम्यान, नेरूळ येथील पुलाच्या उताराला काही वेळासाठी विसर्जन थांबवण्यात आले असता, उतारामुळे ट्रॉली पुढे सरकली होती. त्यावेळी मूर्तीच्या प्रभावळीचा वरचा भाग उपरी विद्युत वायरीला टेकला. त्यामुळे मूर्तीमधून विद्युत प्रवाह वाहून चौघांना शॉक लागला होता. सुदैवाने वायरीला प्रभावळ टेकताच स्पार्क होवून मुख्य विद्युत प्रवाह खंडित होवून चौघांना अर्थिंगचा झटका बसला होता. त्यानुसार या दुर्घटनेला मंडळावर हलगर्जीचा ठपका ठेवून नेरुळ पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
>विसर्जन मिरवणुकीत मूर्तीची प्रभावळीला वीज वाहिन्यांचा स्पर्श झाला. यावेळी चौघांना शॉक लागला. नेरूळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.