Crime: इंजिनीअरिंग कॉलेजच्या स्टेशनरीचे दहा लाख घेऊन चालक फरार, चावी गाडीत ठेवून काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 12:44 PM2023-04-16T12:44:24+5:302023-04-16T12:44:35+5:30
Navin Panvel: काॅलेजचे प्राध्यापक हे चालकास गाडीत बसून राहण्यास सांगून प्राचार्यांसोबत जेवण करण्यासाठी गेले असता चालक संतोष केशव गिरी याने गाडीच्या डिक्कीतील दहा लाख रुपये घेऊन पलायन केल्याची घटना घडली.
नवीन पनवेल : अहमदनगर येथील इंजिनीअरिंग काॅलेजचे प्राध्यापक हे चालकास गाडीत बसून राहण्यास सांगून प्राचार्यांसोबत जेवण करण्यासाठी गेले असता चालक संतोष केशव गिरी याने गाडीच्या डिक्कीतील दहा लाख रुपये घेऊन पलायन केल्याची घटना घडली. याप्रकरणी कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिरुद्ध माणिक अडसूळ हे वाघमळा, अहमदनगर येथे राहत असून ते अडसूळ टेक्निकल कॅम्पस या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षक आहेत. त्यांनी त्यांच्या स्कोडा गाडीवर संतोष गिरी (वय ४८) याला चालक म्हणून ठेवले. १३ एप्रिल रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास ते पुण्याला जाण्यासाठी निघाले. संध्याकाळी आठ वाजता तेथे पोहोचले. यावेळी संस्थेसाठी लागणारे बुक व जनरल घेण्यासाठी वेळ नसल्याने ते पुस्तके न घेता परत निघाले. यावेळी रात्री दहाच्या सुमारास कळंबोली येथील हॉटेल कॅप्टन अँड रेस्टॉरंट येथे जेवणासाठी गाडीतून खाली उतरले. यावेळी ड्रायव्हरला गाडीत बसून राहण्यास सांगून अनिरुद्ध, त्यांचा मुलगा व प्राचार्य पाटील हे जेवणासाठी आतमध्ये गेले. जेवण करून बाहेर आले असता गाडी ज्या ठिकाणी उभी केली होती त्या ठिकाणी ती दिसली नाही. गाडीचा त्यांनी शोध घेतला.
गाडीच्या डिक्कीत सापडली बॅग
बार समोरील रस्त्यावर ती उभी केलेली दिसली. मात्र, गाडीत ड्रायव्हर नव्हता. त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला असता त्याने गाडीमध्ये चावी ठेवली आहे, असे सांगून फोन कट केला. यावेळी गाडीची डिक्की खोलून बॅग पाहण्यास सांगितले असता डिक्कीत बॅग होती. मात्र, या बॅगेत ठेवलेले दहा लाख रुपये मिळून आले नाहीत. त्यामुळे संतोष केशव गिरी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.