कमलाकर कांबळे, नवी मुंबईबेकायदा बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात सिडकोने नवीन वर्षात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापुढे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण खपवून न घेण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात आता थेट एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सपाटा सिडकोने लावला आहे. याअंतर्गत गेल्या चार दिवसांत पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिडकोने गेल्या महिन्याभरापासून गाव-गावठाण व त्याच्या आजूबाजूच्या जागेवर उभ्या असलेल्या अनधिकृत इमारती पाडण्याची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. गेल्या आठवड्यात घणसोलीसह तळवली भागातील अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. तर मागील सहा महिन्यात उभ्या राहिलेल्या ५७८ बेकायदा बांधकामांना एमआरटीपी अॅक्टनुसार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. येत्या काळात या बांधकामांवर धडक कारवाई करण्याची योजना सिडकोने बनविली आहे. या कारवाईसाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनधिकृत इमारतीवर कारवाई सुरू असतानाच बेकायदा बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा धडाका सिडकोने लावला आहे. मागील आठ दिवसांत सिडकोने केलेल्या तक्रारीवरून एकट्या कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पाच वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात कोपरखैरणे सेक्टर-४ए मधील १४१.१० चौ.मी. जागेवर पक्के बांधकाम केल्याप्रकरणी सिडकोच्या तक्रारीवरून अतिश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरखैरणे पोलिसांनी त्याच्याविरोधात महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असता, न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. दुसऱ्या प्रकरणात कोपरखैरणे सेक्टर-५ए मध्ये ३१.२० चौ.मी. जागेवर लोखंडी पाइपचे शेड टाकून त्याचा विनापरवाना वाणिज्य वापर केल्याप्रकरणी अभिजित म्हात्रे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कोपरखैरणे सेक्टर-१२ मध्ये सिडकोच्या जागेवर ४२०.७६ चौ.मी. जागेवर पक्के बांधकाम करणाऱ्या नरोत्तम गणपत नाईक याच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याचबरोबर कोपरखैरणे सेक्टर-१९ मधील होळीच्या मैदानालगत १७६ चौ.मी. जागेवर कोपरखैरणे ग्रामविकास मंडळाने बांधकाम करून समाजमंदिर उभारले आहे. याविरोधात सिडकोने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. तर होळीच्या मैदानालगत पक्के बांधकाम करणाऱ्या भास्कर लडक्या म्हात्रे याच्या विरोधात देखील सिडकोने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे दाखल करण्यापूर्वी सिडकोच्या वतीने या पाचही प्रकरणांमध्ये एमआरटीपीअंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटिसीला उत्तर देताना सर्वांनी आपण प्रकल्पग्रस्त असून, सदरचे बांधकाम सन २००७ पूर्वीचे व मूळ गावठाणपासून २०० मीटरच्या आत असल्याचे उत्तर सिडकोला दिले होते. त्यामुळे सदरचे बांधकाम नियमित करण्याची विनंती सिडकोकडे वारंवार करण्यात आल्याचे या बांधकामधारकांचे म्हणणे आहे. मात्र सिडकोने या बांधकामधारकांचे म्हणणे अमान्य करून त्यांना सदरचे अनधिकृत इमारती स्वत:हून निष्कासित करण्याची नोटीस बजावली होती.
अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे
By admin | Published: January 07, 2016 1:01 AM