चिमुकलीला विष देणाऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:05 AM2019-11-12T05:05:56+5:302019-11-12T05:05:58+5:30
शहरातील समीर लॉजमध्ये प्रेयसी व प्रियकराने २ वर्षांच्या मुलीसह विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
पनवेल : शहरातील समीर लॉजमध्ये प्रेयसी व प्रियकराने २ वर्षांच्या मुलीसह विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात चिमुकलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी लिजी कुरीयन व वाशिम अब्दुल कादीर या दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेलमध्ये ९ नोव्हेंबर रोजी समीर लॉज या ठिकाणी विष प्राशन केल्याने जोहाना या दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान लिजीने प्रियकर वाशिम अब्दुल कादीर यांच्या मदतीने पती रिजोश याचा केरळ येथे खून केल्याचे उघड झाले. या प्रकरणी त्यांच्याविरोधात शंतपारा पोलीस स्टेशन, ईडुक्की, केरळ येथे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिजी कुरीयन व वाशिम अब्दुल कादीर या दोघांनी रिजोशची हत्या केली. त्यानंतर ते दोघे मुंबई, पनवेल येथे पळून आले. लिजी कुरीयन व वासिम अब्दुल कादीर यांनी विषारी औषध देऊन जोवाना हिला मारले. रिजोशच्या खुनाच्या गुन्ह्यात त्यांना अटक होऊ नये म्हणून त्यांनी स्वत: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानुसार १० नोव्हेंबर रोजी रिजोश याचे भाऊ आणि जोहाना हिचे चुलते जिजोश विन्सेंन्ट यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे येथे येऊन मुलगी जोवाना हिची ओळख पटवली.
जोहाना हिला विषारी औषध पाजून ठार मारल्याबद्दल तिची आई लिजी कुरीयन व वासिम अब्दुल कादीर यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. जोहाना हिचा मृतदेह अंत्यविधीसाठी जिजोश यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. गुन्ह्यातील विष प्राशन केलेल्या दोन्ही आरोपींवर जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असून ते अद्याप जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.