अनधिकृत होर्डिंग्जप्रकरणी दोषींवर होणार फौजदारी कारवाई, महापालिकेची आक्रमक भूमिका
By नामदेव मोरे | Published: May 17, 2024 07:04 PM2024-05-17T19:04:25+5:302024-05-17T19:04:47+5:30
नवी मुंबई : अनधिकृत होर्डिंग्जविरोधात नवी मुंबई महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी १५ व दुसऱ्या दिवशी ...
नवी मुंबई : अनधिकृत होर्डिंग्जविरोधात नवी मुंबई महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी १५ व दुसऱ्या दिवशी ५ होर्डिंग्जवर कारवाई करून अनधिकृत होर्डिंग्जला जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.
मुंबईमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनीही अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश प्रशासनास दिले आहेत. बुधवारी सायंकाळ ते गुरुवारी सकाळपर्यंत शहरातील १५ अनधिकृत होर्डिंग्ज हटविले होते. होर्डिंग्जविरोधातील मोहीम सुरूच ठेवली असून दुसऱ्या दिवशी ५ होर्डिंग्जचे सांगाडे हटविले. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डाॅ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. ठाणे-बेलापूर राेडवर हॉटेल रामाडा व औरम निवासी संकुल अशा दोन ठिकाणी कारवाई केली. ठाणे-बेलापूर रोडवर कोपरखैरणे विभागात एमआयडीसी अग्निशमन दलाजवळील मोठ्या आकाराचा हाेर्डिंगचा सांगाडा काढण्यात आला. तुर्भे विभागात एपीएमसी मार्केट व तुर्भे रेल्वे स्टेशनजवळील होर्डिंगही हटविले आहे.
प्रत्येक विभागातील अनधिकृत होर्डिंग्जचे सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली जाणार आहे. होर्डिंगप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हेही दाखल केले जाणार आहेत.
नागरिकांनी केले स्वागत
नवी मुंबई महानगरपालिकेने होर्डिंग्जविरोधात सुरू केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंगच्या लोखंडी सांगाड्यामुळे अपघात होऊन जीवित व वित्तहानीची शक्यता आहे. यामुळे सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर सरसकट कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. कोणत्याही दबावाला प्रशासनाने बळी पडू नये, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
अनधिकृतचा आकडा १५० वर
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात २०१ होर्डिंग अधिकृत आहेत. अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण ८ विभाग कार्यालयांच्या माध्यमातून सुरू केले आहे. १५० पेक्षा जास्त अनधिकृत होर्डिंग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर निश्चित आकडा स्पष्ट होणार आहे. महानगरपालिकेने अनधिकृत होर्डिंग लावलेल्या गृहनिर्माण सोसायटीवरही कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे अनेक इमारतींवरील होर्डिंग सोसायटीधारकांनी स्वत:च काढण्यास सुरुवात केली आहे.
विभाग कार्यालयांमार्फत अनधिकृत होर्डिंग्जचे सर्वेक्षण केले आहे. आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे कारवाई तीव्र केली आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी व दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
डॉ. राहुल गेठे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग