पनवेल : कामोठे येथील रहिवासी सचिन कांबळे (३५) यांना मारहाण केल्याप्रकरणी आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड व त्यांच्या साथीदारांवर कामोठे पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री गायकवाड यांनी माझ्या अपहरणाचा कट रचून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सचिन कांबळे यांनी केला आहे. अडीच वर्षांपूर्वी सचिन कांबळे हा जगदीश गायकवाड यांचा स्वीय सहायक म्हणून काम पाहत होता. रविवारी मध्यरात्री जगदीश गायकवाड यांच्यासोबत काम करणारा विक्र म बेरगळ याचा सचिनला फोन आला. त्याने कामोठे येथील वेंकट प्रेसिडेन्सी या ठिकाणी निवडणुकीच्या प्रक्रियेसंदर्भात बोलायचे आहे, असे सांगून सचिनला बोलावून घेतले. या वेळी सचिन व विक्र म यांची चर्चा सुरू असताना ४,१४१ क्र मांकाच्या फॉरच्युनर गाडीतून जगदीश गायकवाड, बबलू कांबळे, निलेश आणि चिन्या हे सर्व आले. त्यांना पाहून सचिनने काढता पाय घेतला असता, त्यांनी त्याचा पाठलाग केला. सचिन कामोठे सेक्टर ६ येथील स्वप्नराज सोसायटीत ओळखीच्या मंगेश धीवार यांच्या घराजवळ मदतीसाठी गेला असता, त्याला गाडीत ओढून मारहाण करण्यात आली. त्याचा मोबाइलही लंपास करण्यात आला. त्यानंतर त्याला आसुडगाव येथे नेण्यात आले. या ठिकाणी जगदीश गायकवाड यांनी शिवीगाळ करीत लोखंडी सळीने मारहाण केल्याची तक्रार सचिन कांबळे यांनी कामोठे पोलीस ठाण्यात दिली आहे. (प्रतिनिधी)
मारहाणप्रकरणी जगदीश गायकवाड यांच्यावर गुन्हा
By admin | Published: February 21, 2017 6:31 AM