पनवेल : पनवेल शहर महानगरपालिका हद्दीतील बेकायदा बॅनर्सविरुद्ध महानगरपालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. जाहिरात करण्यासाठी बेकायदा फलक लावणाऱ्या विविध कंपन्या, राजकीय बॅनर्स, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांना मोहिमेचा दणका बसला आहे. सुमारे १२ ते १७ फलकांचा पंचनामा करून संबंधित मालकांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. महानगरपालिका स्थापन झाल्यापासून गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.महापालिकेने अवैध होर्डिंग, पोस्टर हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत हजारो पोस्टर्स-बॅनर्स काढण्यात आले. यापुढे याबाबत तक्र ार करून गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांना पत्र देण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने अवैध होर्डिंग व पोस्टर हटविण्याचे निर्देश दिल्यानंतर पनवेल महापालिकेनेही तत्काळ कारवाई सुरू केली. मालमत्ता विद्रूपीकरण कायद्यानुसार पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आहे. विभाग कार्यालयांकडून अवैध होर्डिंगधारकांची नावे मागविण्यात आली आहेत. अवैध होर्डिंग्ज, पोस्टर्सवर ज्यांची नावे आहेत, त्यांच्याविरुद्धच तक्रार करण्यात येणार असल्याने सूत्राने सांगितले. अवैध होर्डिंगबाबत पोलिसांनाही स्वयंस्फूर्तीने गुन्हा दाखल करता येत असल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ज्यांनी होर्डिंग्ज, बॅनर्स लावण्याकरिता महापालिकेने घोषित केलेल्या बॅनर स्टॅण्डचा वापर केला, त्यांना वगळून परवानगी न घेणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात येणार आहे. यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडतेच, शिवाय शहराचे विद्रूपीकरण होते. कारवाईत सर्वच पक्षाचे राजकीय पदाधिकारी, संघटना, खासगी संस्थांचा समावेश आहे. काही ठिकाणी बॅनर्स काढण्यास विरोध होत असल्यामुळे आयुक्तांनी स्वत: उपस्थित राहून असे बॅनर्स काढून घेतले. केवळ बॅनर्स न काढता शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा आयुक्तांनी घेतला आहे. पनवेलच्या इतिहासात अशाप्रकारे गुन्हे दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नगर परिषद असताना केवळ होर्डिंग काढून टाकण्यात येत होते. त्यामुळे राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांचे चांगलेच फावत होते. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी कठोर कारवाई करण्यास सुरु वात केल्याने सर्वांचेच धाबे चांगलेच दणाणले आहेत. (प्रतिनिधी)
पनवेलमध्ये अनधिकृत बॅनर्स माफियांवर गुन्हे दाखल
By admin | Published: November 12, 2016 6:41 AM