महापालिका आयुक्तांच्या आदेशाला हरताळ
By admin | Published: May 16, 2017 12:57 AM2017-05-16T00:57:35+5:302017-05-16T00:57:35+5:30
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील खोदकाम तत्काळ बंद करण्यात यावे. यापूर्वी खोदलेले चर तत्काळ दुरुस्त करण्यात यावेत असे आदेश पालिका
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील खोदकाम तत्काळ बंद करण्यात यावे. यापूर्वी खोदलेले चर तत्काळ दुरुस्त करण्यात यावेत असे आदेश पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी दिले आहेत. परंतु या आदेशाला हरताळ फासून खोदकाम करणाऱ्यांना अभय दिले जात आहे. नेरूळमध्ये एमजीएल गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले असून याविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.
आयुक्त रामास्वामी एन. यांनी मागील आठवड्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेसह,पोलीस, एमआयडीसीसह सर्व संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये शहरातील खोदकाम तत्काळ थांबविण्याच्या सूचना केल्या होत्या. एमजीएल, एमटीएनएल, महावितरण व इतरांनी आता आपत्कालीन स्थिती वगळता इतर कोणत्याही कामांसाठी रस्ते खोदू नयेत. यापूर्वी खोदकाम केलेल्या रस्त्यांची तत्काळ डागडुजी करण्यात यावी अशा सूचना दिल्या होत्या. परंतु महापालिका प्रशासनाने या सर्व नियमांना हरताळ फासला आहे. दोन दिवसांपासून नेरूळ सेक्टर २० मधील तलाव ते एन. आर. भगत स्कूलपर्यंतचा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात येत आहे. घाईगडबडीत रस्ता खोदून पाइप टाकण्याचे काम केले जात आहे. वास्तविक वळवाचा पाऊस पडून गेलेला असताना व कोणत्याही क्षणी पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता असताना खोदकाम करणे योग्य नाही. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराला पाठीशी घालून चांगले रस्ते खोदण्यास सुरवात केली आहे.
यापूर्वीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले जात होते. त्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होण्याची भीती असल्याने तत्काळ आदेशाचे पालन होत होते. परंतु विद्यमान आयुक्त रामास्वामी एन. यांनी अद्याप कडक भूमिका घेतली नसल्याने त्यांचे आदेश पायदळी तुडवित खोदकाम करणाऱ्यांवर व त्यांना अभय देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.