कोपर खैरणेत पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड

By सूर्यकांत वाघमारे | Published: March 3, 2024 06:12 PM2024-03-03T18:12:26+5:302024-03-03T18:13:23+5:30

कोम्बिंग ऑपरेश : चार गुन्हेगारासह एक बांग्लादेशी लागले हाती.

criminals arrested by police in kopar khairane navi mumbai | कोपर खैरणेत पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड

कोपर खैरणेत पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड

सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कोपर खैरणे परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून शनिवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन घेण्यात आले. त्यामध्ये चार सराईत गुन्हेगार व एक बांगलादेशी महिला पोलिसांच्या हाती लागले. तर एका गुन्हेगारासोबतच्या झटापटीत वरिष्ठ निरीक्षक जखमी झाले आहेत.

कोपर खैरणे परिसरात सातत्याने गुन्हेगारी कृत्ये घडत आहेत. गल्ली बोळात टोळ्या तयार झाल्या असून त्यांच्यातही आपसात हाणामारीच्या घटना घडत आहेत. अशा टोळ्यांमधून भाई होऊ पाहणारे, चोऱ्या घरफोड्या करणारे यांना प्रतिबंध करण्याचे पाऊल पोलिसांनी उचलले आहे. त्यासाठी उपायुक्त पंकज डहाणे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रात्री कोपर खैरणे पोलिसठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यासाठी वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील, निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मदतीला मुख्यालयातून राखीव दलाच्या १४ तुकड्या पुरवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये २५ अधिकारी व १४० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यांच्यामार्फत शनिवारी रात्री कोपर खैरणे, घणसोली परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच गस्त घालून गुन्ह्येगारांचा शोध घेतला जात होता. यामध्ये चार सराईत गुन्हेगार व एक बांग्लादेशी महिला मिळून आली. सलीम इमाम खान (२८), रिझवान सादिक कुरेशी (३२), अज्जू फ्रान्सिस (२७), साहिल अन्सारी (२२) व पॉपी मुल्ला (२०) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी तिघे खैरणे तर एक बोनकोडेचा राहणारा आहे. 

सलीम याच्यावर घरफोडीचे १७ गुन्हे दाखल आहेत. मात्र अनेक दिवसांपासून तो पोलिसांना चकमा देत होता. तर साहिल याच्यावरही चोरीचे गुन्हे दाखल असून त्याच्याकडून चोरीचे चार मोबाईल मिळून आले. खैरणे गावात कुलसुम इमारतीमध्ये पॉपी मुल्ला हि बांग्लादेशी महिला मिळून आली असून तिचे दोन नातेवाईक अंधारात पळून गेले.

थोडक्यात टळला गुन्हा

कोपर खैरणे सेक्टर ५ येथील मार्गाने वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील हे सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना पारसिक बँकेसमोर दुचाकीवर उभ्या असलेल्या तरुणावर संशय आला. त्याचवेळी दुचाकीवरील तरुण त्याच्याकडील कोयता काढण्याच्या तयारीत असतानाच त्याची नजर पोलिसांच्या गादीवर पडली. यामुळे तो पळ काढत असताना औदुंबर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाटील यांनी त्याच्याकडील कोयता हिसकावला असता झटापटीत पाटील हे जखमी झाले असता संशयित गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाला.

Web Title: criminals arrested by police in kopar khairane navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.