जुईनगरवासीयांमध्ये मगरीची दहशत

By admin | Published: May 3, 2017 06:09 AM2017-05-03T06:09:10+5:302017-05-03T06:09:10+5:30

जुईनगर येथील नाल्यातील मगरीच्या अस्तित्वामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ही मगर भक्षाच्या शोधात

Criminals panic in Juinagar residents | जुईनगरवासीयांमध्ये मगरीची दहशत

जुईनगरवासीयांमध्ये मगरीची दहशत

Next

नवी मुंबई : जुईनगर येथील नाल्यातील मगरीच्या अस्तित्वामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ही मगर भक्षाच्या शोधात रहिवासी भागात येण्याची शक्यता असल्याने अनेकांनी नाल्यालगतच्या रस्त्याचा वापरच बंद केला आहे; परंतु गेल्या वर्षभरापासून ही मगर निदर्शनास येत असतानाही वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची खंत लोकप्रतिनिधींकडून व्यक्त होत आहे.
जुईनगर व सानपाडा परिसरादरम्यानच्या मोठ्या नाल्यात मागील वर्षभरापासून मगरीचे अस्तित्व असल्याचे अनेकांच्या पाहण्यात आले आहे. त्या ठिकाणी एक किंवा एकापेक्षा जास्त मगर असाव्यात, असा प्रत्यक्षदर्शीचा अंदाज आहे. आठ महिन्यांपूर्वी काहींनी या मगरीचे छायाचित्रही काढले होते. तेव्हापासून परिसरातील रहिवासी मगरीच्या दहशतीच्या सावटाखाली आहेत. अशातच मागील काही दिवसांपासून पुन्हा त्या ठिकाणी मगर दिसू लागली आहे. नाल्याला लागूनच रस्ता असून या रस्त्याने जाणाऱ्या अनेकांनी ही मगर पाहिली आहे. या नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असून लगतच्या परिसरात मोठी झाडीही वाढलेली आहे. ही मगर नाल्याबाहेर येऊन झाडीचा फायदा घेत एखाद्या पादचाऱ्यावरही हल्ला करण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी इमारतीलगच्या मोकळ्या भूखंडावरील वाढलेली झाडीही कापून टाकली आहे. तरीही मगरीच्या भीतीपोटी अनेकांनी नाल्यालगतच्या रस्त्याचा पायी वापर बंद केला आहे. पुढील महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर नाल्यातील पाण्याची पातळी वाढणार आहे.
या वेळी पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटाराच्या पाण्यातून ही मगर रहिवासी भागातही घुसण्याची शक्यता आहे. तशा प्रकारची दोन गटारे या मोठ्या नाल्याला जोडली गेलेली असल्याने वेळीच या मगरीचा शोध घेऊन तिला इतरत्र सोडावे, अशी रहिवाशांची मागणी आहे. याकरिता अनेक महिन्यांपासून पालिका प्रशासन व वन विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र पाटील यांनी सांगितले. यानंतरही दोन्ही प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी पाटील यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेवरून
त्यांना एखादा नागरिक मगरीचा
भक्ष बनण्याची प्रतीक्षा असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Criminals panic in Juinagar residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.