नवी मुंबई - न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर अथवा जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराची देखील तपास अधिकाऱ्यांना यापुढे पोलिस कोठडी घेता येणार आहे. त्यासाठी पोलिसांना न्यायालयाकडे मागणी करावी लागणार आहे. यामुळे एखाद्या तपासात टप्प्या टप्य्याने समोर आलेल्या माहितीत संबंधित गुन्हेगाराची पुन्हा.. पुन्हा.. चौकशी पोलिसांना करता येणार आहे.
अनेकदा गुन्हेगाराला अटक केल्यानंतर पोलिसांना त्याची पाच किंवा सात दिवसांची कोठडी मिळत असते. त्यानंतर सदर गुन्हेगार न्यायालयीन कोठडीत गेल्यास किंवा त्याला जामीन मिळाल्यास पोलिसांना त्याचा पुन्हा ताबा घेता येत नाही. दरम्यान काही दिवसानंतर तपासात अधिक काही माहिती समोर आल्यास पुन्हा त्या गुन्हेगाराला पोलिस कोठडी मिळवता येत नाही. यामुळे पोलिसांच्या तपासात अनेक बाबी हातून निसटत असतात. त्याचा परिणाम तपासकामावर देखील होत असतो. मात्र यापुढे गुन्हेगाराला मिळणारी १४ दिवसांची कोठडी टप्प्या टप्प्याने देखील पूर्ण करता येणार आहे. ज्या गुन्ह्यात ९० दिवसात चार्जशीट दाखल करायची आहे, अशा गुन्ह्यातील गुन्हेगाराला पोलिसांच्या मागणीनुसार ६० दिवसाच्या आत एकपेक्षा अधिक वेळा कोठडी मिळू शकणार आहे. तर ज्या गुन्ह्यात ६० दिवसांपर्यंत चार्जशीट दाखल करायची, अशा गुन्ह्यात ४० दिवसांपर्यंत कधीही पुन्हा, पुन्हा कोठडी मिळवता येणार आहे. त्यामुळे संबंधित गुन्हेगाराची १४ दिवसांची कोठडी टप्प्या टप्प्याने देखील पूर्ण होऊ शकणार आहे.