सिडकोच्या कारवाईला तीव्र विरोध, प्रकल्पग्रस्त झाले आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 01:46 AM2019-05-04T01:46:55+5:302019-05-04T01:47:35+5:30
कोल्ही-कोपर येथील घटना : प्रकल्पग्रस्त आक्रमक झाल्याने कारवाई थांबविली
पनवेल : कोल्ही कोपर येथे ३१ एकर जागेवर कोपर गावातील ग्रामस्थांनी बांधलेल्या घरांवर कारवाई करण्यासाठी सिडकोने शुक्रवारी मोहीम राबविली होती. ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्यामुळे सिडकोच्या पथकाला कारवाई न करताच परत जावे लागले.
सरकारने येथील जमीन संपादित करून पनवेल नगरपरिषदेला मलनि:सारण केंद्र उभारण्यासाठी दिली होती. या जागेचा मोबदला अद्याप स्थानिक प्रकल्पग्रस्तांना मिळाला नसल्याने ग्रामस्थांनी या जागेवर चाळी बांधल्या आहेत. ही जमीन आता विमानतळासाठी वर्ग करण्यात आली असल्याने जागेचा ताबा घेण्यासाठी अतिक्र मण विभागाचे पथक पोलीस बंदोबस्तामध्ये याठिकाणी आले होते. ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येऊन कारवाईला विरोध केला.
पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे ही कारवाई पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे अधिकारी विशाल ढगे यांनी दिली. पुढील आठ दिवसांत ही कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. दरम्यान, कारवाई थांबविण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक घटनास्थळी उपस्थित होते.
पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत यासंदर्भात बैठक घेऊन ग्रामस्थ व सिडको अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. ही जमीन कोपर गावातील ३0 शेतकऱ्यांच्या मालकीची होती अशी माहिती स्थानिक प्रकल्पग्रस्त प्रशांत पाटील यांनी दिली. अनेक वर्षे होऊन देखील आम्हाला आमच्या जागेचा मोबदला मिळाला नसल्याने आम्ही याठिकाणी घरे बांधली आहेत. आम्हाला जागेचा मोबदला सर्वप्रथम मिळावा, अशी मागणी पाटील यांनी केली.