उरणमधील कार्यकर्ता मेळाव्यात सेनेची भाजपवर टीका
By admin | Published: November 7, 2016 02:57 AM2016-11-07T02:57:51+5:302016-11-07T02:57:51+5:30
राज्यात कुठेही सेना भाजपाची आघाडी झाली तरी उरणमध्ये आघाडी होणार नाही. शहराच्या विकासासाठी शासनाने ५७ कोटी मंजूर केल्याचे वारंवार सांगण्यात आले.
उरण : राज्यात कुठेही सेना भाजपाची आघाडी झाली तरी उरणमध्ये आघाडी होणार नाही. शहराच्या विकासासाठी शासनाने ५७ कोटी मंजूर केल्याचे वारंवार सांगण्यात आले. मग मंजूर केलेला निधी कुठे अडकला, याचा उरणमधील भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी शोध घ्यावा, अशी टीका सेनेचे जिल्हाप्रमुख आ. मनोहर भोईर यांनी नगराध्यक्ष महेश बालदी यांचे नाव न घेता केली.
स्वबळावर निवडणूक लढवून नगराध्यक्षपदाला गवसणी घालून उरण नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकविण्याचा विश्वास जिल्हाप्रमुखांनी उरण येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यातून जाहीर केला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आयोजक तालुका प्रमुख डी. एन. डाकी, शहर प्रमुख महेंद्र पाटील, उपनगराध्यक्षा सुजाता गायकवाड यांनी रविवार कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन के ले होते.
मेळाव्याला मार्गदर्शन करताना जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड वाटप, विविध प्रकल्पात होणारी कामगार भरती, ओएनजीसीमधील ३५० कंत्राटी कामगारांना कायम करणे आदी विषय भोईर यांनी मांडले. सुमारे २५ हजार कुटुंबीयांना बेघर करू पाहणारा नौदलाचा सेफ्टी झोन रद्द होणार आहे. शिवसेनेचे आमदार, खासदारांनी केलेल्या सातत्याने पाठपुराव्यामुळे तसा अध्यादेशही नजीकच्या काळात काढला जाणार आहे. त्यामुळे सेफ्टी झोनमधील नागरिकांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे मनोहर भोईर यांनी सांगितले.