नवी मुंबई : खाडीकिनाºयाजवळील जैवविविधतेमध्ये वाढ होत आहे. काही दिवसांपासून सानपाडा व जुईनगरच्या मध्यभागी असलेल्या नाल्यात मगरीचे दर्शन होऊ लागले असून, हा नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय बनला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एक बाजूला दिघा ते बेलापूर दरम्यान डोंगररांग असून दुसरीकडे दिवा ते दिवाळेपर्यंत खाडीकिनारा व खारफुटीचे जंगल आहे. या परिसरातील जैवविविधतेमध्ये वाढ होत आहे. यामध्ये १६८ प्रकारचे पक्षी, ८० प्रकारचे सरपटणारे व उभयचर प्राणी, १४० प्रकारची फुलपाखरे, १२५ प्रकारचे मत्स्यजीव व ८०० प्रकारची फुलझाडे आढळून येत आहेत.खवल्या मांजराचेही अस्तित्व आढळले असून काही दिवसांपासून जुईनगर व सानपाडाच्या मध्यभागी असलेल्या नाल्याच्या काठावर मगर दिसू लागली आहे. येथील रहिवासी मनोज भोईर व इतर काही कामगारांनी आठ दिवसांमध्ये अनेक वेळा या ठिकाणी मगर पाहिली आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वीही मगरीचे अस्तित्व आढळून आले होते. हा विषय परिसरामध्ये कुतूहलाचा बनला असून अनेक नागरिक मगर पाहण्यासाठी नाल्याच्या दिशेने जात आहेत.
नाल्यात दिसलेल्या मगरीविषयी अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. नाल्यात ज्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ कमी असते, त्या परिसरामध्ये मगरीचे वास्तव्य आहे. यामुळे त्याचा धोका परिसरातील कोणालाही नाही; परंतु खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्यांनी सावधानता बाळगावी, असे मतही काही नागरिकांनी व्यक्त केले आहे.सानपाडामधील नाल्याच्या काठावर काही कामगारांना प्रथम मगर दिसली. अनेक वेळा आम्हाला त्या परिसरात मगरीचे अस्तित्व असल्याचे दिसून आले आहे. - मनोज भोईर, सानपाडा