पालिका मुख्यालयालगत खाडीत दिसलेली मगर चार दिवसांनी लागली हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:24 PM2021-02-23T23:24:57+5:302021-02-23T23:25:10+5:30
मच्छीमारांनी घेतला सुटकेचा श्वास
नवी मुंबई : बेलापूर येथील पालिका मुख्यालयालगतच्या खाडीत मगर दिसून आली होती. तेव्हापासून त्या ठिकाणची मच्छीमारी बंद करण्यात आली होती. या मगरीचे त्या ठिकाणावरून स्थलांतर करण्यासाठी सापळा रचला असता सोमवारी रात्री ती पिंजऱ्यात अडकली.
नवी मुंबई खाडीकिनारी भागात समुद्री जीव आढळून येत आहेत.
काही वर्षांपूर्वी जुईनगर येथील नाल्यात सातत्याने मगरीचे दर्शन घडत होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी बेलापूर येथील पालिका मुख्यालयलगतच्या खाडीत मच्छीमारांना मगर दिसली होती. या मगरीपासून मच्छीमारांना धोका होता. यामुळे त्या ठिकाणी मच्छीमारी बंद करण्यात आली होती. या मगरीचे तिथून स्थलांतर करण्यासाठी वनविभागाच्यावतीने वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेमार्फत कॅमेरे व पिंजरा लावण्यात आला होता.
अखेर चार दिवसांनी सोमवारी रात्री ही मगर पिंजऱ्यात बंदिस्त झाल्याचे आढळून आले. त्यानुसार या मगरीला त्या ठिकाणावरून सुरक्षित बाहेर काढून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे मच्छीमारांनी सुटकेचा श्वास घेतला असून त्यांची बंद झालेली मच्छीमारी सुरू करण्याचा मार्ग सुरक्षित झाला आहे.