पीक विम्याचा रात्रीस खेळ चाले, दिवसभर संकेतस्थळ हँग होत असल्याने गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 03:27 PM2023-07-30T15:27:03+5:302023-07-30T15:28:16+5:30
रात्री बारानंतर होते प्रक्रिया सुरळीत : १५,५०० शेतकरी राहणार वंचित
अरुणकुमार मेहत्रे -
कळंबोली : पनवेल तालुक्यात पीक विमा काढण्याची लगबग सुरू आहे. एक रुपयात पीक विमा असला तरी पनवेल तालुक्यात त्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. जे शेतकरीपीक विमा भरतात, त्यांना ऑनलाइन संकेतस्थळ हँग होत असल्याने अडचणी येत आहेत. रात्री बारानंतर संकेतस्थळ सुरळीत सुरू राहत असल्याने पीक विम्याचा रात्रीस खेळ चाले असे चित्र निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान वाढत आहे. त्यात यंदा पेरणी व भातलावणी उशिराने झाली आहे. पाऊस जास्त प्रमाणात झाला आहे. दरवर्षी पीक विमा काढण्यासाठी विमा कंपन्यांना मोठी रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागत होती. मात्र, यंदा शासनाने पीक विमा रक्कम स्वत:भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना एक रुपया भरून तो काढता येणार आहे. पनवेल तालुक्यात जवळपास २० हजार शेतकरी आहेत. त्यापैकी शुक्रवारपर्यंत ४७१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढायचा आहे, त्यांच्या अडचणी संकेतस्थळ सुरळीत चालत नसल्याने वाढल्या आहेत. पीक विमा भरण्यासाठी दोन दिवस राहिले असून, शासनाने मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्याला मुकणार असल्याचे चित्र सध्या पनवेल तालुक्यात निर्माण झाले आहे.
आठ दिवसांपासून अडचण सुरू
पीक विमा काढण्यासाठी अचानक संकेतस्थळावर लोड वाढला आहे. सातबारा प्रमाणिकरण न होणे किंवा ऑनलाइन संकेतस्थळ बंद होण्याच्या या अडचणी गत आठ दिवसांपासून सुरू आहेत. त्यामुळे एका केंद्रावर दिवसाला एक ते दोन शेतकऱ्यांचाच विमा काढला जातो आहे.
२ दिवसांत काय होणार?
पीक विमा काढण्यासाठी अंतिम मुदत ही ३१ जुलै आहे. परंतु, संकेतस्थळ स्लो झाल्याने विमा काढण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत ई- सेवा केंद्र चालकही हैराण झाले आहेत.
आता अवघे दोन दिवस उरल्याने तो काढण्याची प्रक्रिया कशी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
गेली आठ दिवस पीक विमा भरण्यासाठी संकेतस्थळाच्या अडचणी येत आहेत. रात्री बारानंतर संकेतस्थळ सुरळीत चालते आहे. दिवसभर चालत नसल्याने चार दिवस पीक विमा भरण्यासाठी अनेकदा चकरा माराव्या लागल्या आहेत. त्यात आता दोन दिवस उरल्याने अनेक शेतकरी पीक विमा भरू शकणार नाहीत. त्यांना सरकारने मुदतवाढ द्यावी.
- राम पाटील, शेतकरी