पावसाने वीटभट्टींचे कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 12:55 AM2020-12-15T00:55:30+5:302020-12-15T00:55:38+5:30
पनवेल तालुक्यातील २५० व्यावसायिकांना फटका; भरपाई देण्याची मागणी
पनवेल : सोमवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे पनवेल तालुक्यातील वीटभट्टी मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान कोटींच्या घरात असून, तब्बल २५० लहान मोठ्या वीटभट्टी व्यावसायिकांना या पावसाचा फटका बसला आहे. शासनाने या संदर्भात नुकसान भरपाई देण्याची मागणी वीटभट्टी व्यावसायिक करू लागले आहे.
पावसाळा संपताच ऑक्टोबर महिन्यात वीटभट्टी व्यवसाय सुरू होतात. याकरिता लागणारे मजूर सोलापूर, कर्नाटक, वाडा आदी ठिकाणावरून आणले जातात. वीटभट्टी कारखाना असलेल्या जागेवरच या मजुरांची राहण्याची सोय केली जाते. व्यवसाय सुरू होण्यापूर्वी काही रक्कम आगाऊ स्वरूपातही वीटभट्टी मालक या मजुरांना देत असतात. वीटभट्टी व्यवसाय करण्यापूर्वी लहान व्यावसायिकांना कमीतकमी १० लाख तर मोठ्या व्यावसायिकांना ५० लाखांची रक्कम या व्यवसायात गुंतवावी लागते. व्यवसाय सुरू झाल्यावर लाल माती आणावी लागते. त्या मातीवर प्रक्रिया करण्यासाठी पाण्यात भिजत ठेवावी लागते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी मजुरांच्या हस्ते ती थापणी केल्यावर साच्यामध्ये भरून विटांना आकार दिला जातो. यानंतर, त्यांना सुकत ठेवले जाते. दोन ते अडीच महिन्यात या कच्च्या विटांना भट्टीमध्ये टाकून त्यांना पक्के केले जाते. अशा निरंतर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. सोमवारच्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात तयार कच्चा माल पूर्ण भिजल्याने वीटभट्टी मालक हवालदिल झाले.
मोठा आर्थिक फटका
शासनाने वीटभट्टी मालकांना मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे तारा येथील वीटभट्टी मालक दिनेश पाटील यांनी सांगितले. पाटील यांच्या वीटभट्टी वर लहान स्वरूपाच्या ३ लाख आणि मोठ्या ब्लॉक ६० हजार तयार कच्च्या विटा अवकाळी पावसात भिजून मातीमोल झाल्याचे पाटील यांनी सांगितले.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. वीटभट्ट्याच्या झालेल्या नुकसानाही माहिती घेतली जाईल.
- अमित सानप, तहसीलदार, पनवेल