वडखळ : पेण पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांचा मुख्यालय बदलीचा अहवाल रायगड जिल्हा परिषदेत पाठविण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना अटक केलेल्या पेण पंचायत समितीचे प्रभारी एम. एन. गढरी यांच्याकडे कोट्यवधींचे घबाड सापडले आहे. नवी मुंबई येथे ७२ लाख रुपये किमतीचा फ्लॅट तसेच १५० ग्रॅम सोनं सापडल्याची माहिती उघड झाली आहे. पेण पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे तक्रारदार यांचा मुख्यालय, अलिबाग येथील बदलीचा अहवाल रायगड जिल्हा परिषद येथे पाठविण्यासाठी पेण पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एम.एन. गढरी यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. या बदलीसाठी गढरी यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला वीस हजारांची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदार यांनी रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २३ जूनला पेण पंचायत समितीमध्ये सापळा रचत तक्रारदारांकडून १५ हजार रुपये रोख रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. गढरी याला चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.