रस्ता ओलांडण्यावरून दोन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:31 AM2017-08-13T03:31:13+5:302017-08-13T03:31:13+5:30
रस्ता ओलांडणा-या कर्मचा-यासोबत भांडण केल्याच्या कारणावरून बारमालकासह कामगारांनी तिघांना जबर मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री शिरवणे येथील सोना बारच्या बाहेर घडला आहे.
नवी मुंबई : रस्ता ओलांडणा-या कर्मचा-यासोबत भांडण केल्याच्या कारणावरून बारमालकासह कामगारांनी तिघांना जबर मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री शिरवणे येथील सोना बारच्या बाहेर घडला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल केला. अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे.
नेरुळ पोलीसठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल असलेला हरप्रित वालिचा हा दोघा साथीदारांसह कारने वाशीच्या दिशेने चालला होता. या वेळी त्याची कार शिरवणेतील सोना बारच्या समोर आली असता, बारचा सुरक्षारक्षक रस्ता ओलांडत होता; परंतु हॉर्न वाजवूनही तो रस्त्यातून हटला नसल्याच्या कारणाने वालिचा व त्याच्या साथीदारांनी त्या सुरक्षारक्षकाला मारहाण करायला सुरुवात केली. हे पाहताच, बारमालक मनोज शेट्टीसह बारच्या ८ ते १० कामगारांनी हॉकी व लाकडी दांडक्याने वालिच्या व त्याच्या दोघा साथीदारांना मारहाण केली. दोन्ही गटांत सुरू असलेल्या या हाणामारीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर घटनेची माहिती मिळताच, नेरुळ पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. या मारहाण प्रकरणी मनोज शेट्टी व बार कर्मचाºयांवर दंगलीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.