नेरुळमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ; प्रादुर्भाव वाढण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 09:08 AM2021-05-10T09:08:29+5:302021-05-10T09:08:37+5:30
नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी झाली असली तरी कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहे.
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु नेरुळमधील मार्केट परिसरात खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असून सुरक्षा नियमांचा विसर पडला आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी झाली असली तरी कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या माध्यमातून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु शहरात सकाळी ११वाजेपर्यंत खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असून मास्क, सोशल डिस्टन्स आदी नियमांचा नागरिकांना विसर पडला आहे.
नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागात रस्ते आणि पदपथावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढली असून अनेक फेरीवाले मास्कचा वापर न करता व्यवसाय करत आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असून प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत.