एपीएमसीत पाचही मार्केटमधील गर्दी नियंत्रणात; भाजीमार्केटमधील किरकोळ विक्री बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 01:00 AM2020-03-31T01:00:34+5:302020-03-31T01:01:01+5:30
आवक नियंत्रणात आल्याने व्यवहार सुरळीत
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवक नियंत्रणात आल्यामुळे पाचही मार्केट सोमवारी सुरळीत सुरू होती. भाजी मार्केटमधील किरकोळ विक्री बंद केल्यामुळे गर्दी आटोक्यात आली असून ग्राहकांनी शिस्तबद्धपणे रांग लावून खरेदी केली.
बाजार समितीमध्ये शनिवारी तब्बल ३० हजार नागरिकांनी गर्दी केल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यामुळे शासन व बाजार समिती प्रशासनाने तत्काळ बैठका घेऊन गर्दी नियंत्रणासाठी सुधारीत नियमावली तयार केली. परिणामी सोमवारी गर्दी कमी करण्यात यश आले.
भाजी मार्केटमध्ये ५३ वाहनांचीच आवक झाली. प्रशासनाने किरकोळ विक्री पूर्णपणे बंद केल्यामुळे अनावश्यक गर्दी थांबली. मुंबई व नवी मुंबईमधील किरकोळ विक्रेत्यांनी ही शिस्तबद्ध पणे रांग लावून भाजी खरेदी केली. सोशल डिस्टटिंगचे काटेकोर पालन होत असल्याचे सोमवारी पहावयास मिळाले. त्यापुढेही अशाचप्रकारे मार्केट सुरू ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.
धान्य मार्केटमध्ये बाहेरून आलेला माल न घेता फक्त मार्केटमधील मालाची विक्री केली जात होती. यामुळे तेथील व्यवहारही सुरळीत सुरू होते. मसाला मार्केटमध्ये आवक कमी असून ग्राहक नसल्याने शुकशुकाट होता. फळ व कांदा मार्केट मध्ये आवक चांगली झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भाजीपालाची घाऊक विक्री
शनिवारी भाजी मार्केटमध्ये जवळपास एक हजार वाहनांची आवक झाली. किरकोळ मार्केट ही सुरू असल्याने ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. पुन्हा तशी गर्दी होऊ नये यासाठी किरकोळ विक्री पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. यापुढे एपीएमसीच्या भाजी मार्केटमध्ये फक्त घाऊक विक्रीच सुरू राहणार आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील गर्दी कमी करण्यासाठी सुधारीत नियमावली तयार केली आहे. काटेकोर अंमलबजावणीमुळे सोमवारी गर्दी नियंत्रणात आणणे शक्य झाले. यापुढेही मार्केट सुरळीत सुरू राहतील.
- अनिल चव्हाण, सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती