बाजार समितीतील गर्दीमुळे धोका वाढला; सुरक्षा नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 11:38 PM2021-02-20T23:38:07+5:302021-02-20T23:38:14+5:30
सुरक्षा नियमांचे उल्लंघन : मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचे पालन नाही, योजना कागदावरच
नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन जवळपास १ लाख नागरिकांची ये-जा सुरू झाली आहे. पाचही मार्केटमध्ये कोरोनाविषयी नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असून त्यामुळे नवी मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाजार समितीने कोरोना नियंत्रणासाठी उभारलेले वैद्यकीय तपासणी कक्ष बंद झाले आहेत. हात धुण्यासाठी बसविलेले नळ चोरीला गेले आहेत. प्रशासनाने व संचालक मंडळाने तत्काळ उपाययोजना करून नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारच्या वर पोहोचली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत.
मुंबई बाजार समिती प्रशासनानेही मार्केट आवारात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. परंतु प्रत्यक्षात बाजार समितीमध्ये या सर्व नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. मागील वर्षभरात बाजार समितीच्या पाचही मार्केटच्या प्रवेशद्वारावर वैद्यकीय कक्ष तयार केला होता. मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे तापमान व ऑक्सिजनची पातळी तपासली जात होती. सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जात होते.
हात धुण्यासाठी प्रवेशद्वारावर बेसीन बसविण्यात आले होते. परंतु सद्य:स्थितीमध्ये वैद्यकीय कक्ष बंद झाले असून इतर उपाययोजनाही कागदावरच राहिल्या आहेत. भाजीपाला व फळ मार्केटमध्ये रोजंदारीवर काम करणारे कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. मार्केटमध्ये एक हजारपेक्षा जास्त कामगार मुक्काम करत असून ते नियमांचे पालन करत नाहीत. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.