बाप्पासाठी पनवेल बाजारपेठेत गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 11:53 PM2020-08-21T23:53:37+5:302020-08-21T23:53:37+5:30
काही नागरिकांच्या तोंडाला मास्क नव्हता तर काहींच्या गळ्यात अडकवलेला होता.
कळंबोली : गणपती बाप्पाच्या आगमनाच्या स्वागत तयारीची लगबग सुरू आहे. त्यानिमित्ताने खरेदीसाठी पनवेल परिसरातील बाजारपेठेत शुक्रवारी दिवसभर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडाला. काही नागरिकांच्या तोंडाला मास्क नव्हता तर काहींच्या गळ्यात अडकवलेला होता.
कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळी पनवेल येथील गणेश मार्केट, रोज बाजार, उरण नाका, लाइन आळी मार्केट, शिवा कॉम्प्लेक्स मार्केट, शिवाजी चौक, टपाल नाका, कळंबोली येथील करवली नाका, भाजी मंडई कामोठे येथील पोलीस ठाण्याजवळील मार्केट, गोकूळ डेअरी चौक या परिसरात गणपती बाप्पासाठी मोत्यांच्या माळा, हार, फुले, विद्युत रोशणाई, मखर, आसन, मिठाई, मोदक इत्यादी साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
पनवेल परिसरातील बाप्पासाठी लागणाऱ्या आरास साहित्य विक्रेत्यांकडून गतवर्षीच्या मालाची विक्री करण्यात येत आहे. पनवेल पालिका हद्दीतील बाजारपेठेत मुंबई, गुजरात येथून माल येतो. यंदा कोरोनामुळे माल आला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यंदा जुन्याच मालावर सण साजरा करत आहेत.
>खरेदीसाठी महाड बाजारपेठेत गर्दी
महाड : गणेशोत्सवाच्या तयारीसाठी महाड बाजारपेठेत गेल्या तीन चार पासून सुरु असलेला गर्दींचा ओघ आज देखील कायम होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्बंध घातल्यामुळे शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात मुंबई, पुणे, ठाणे, सुरत आदी शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांनी मात्र आपल्या गावाकडे यंदा पाठ फिरवण्याचे दिसून येत आहे. आठ दिवसांपूर्वीच आपल्या गावी काही चाकरमानी दाखल झाले असले तरी गावांत त्यांना अनेक बंधने पाळावी लागत आहेत. शुक्रवारी महाड बाजारपेठेतील कपडे, मिठाई, सजावटींच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. मुख्य बाजारपेठेसह शिवाजी चौकदेखील आज गर्दीने गजबजून गेला होता. यामुळे मुख्य मार्गांवर अनेकदा वाहतुकीची कोंडी झाली होती. महाड शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून सर्व विसर्जन घाट देखील स्वच्छ करण्यात आलेले आहेत. गणेशोत्सव काळात नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत ठिकठिकाणी मार्गदर्शक सुचनांचे फलक लावण्यात आलेले आहेत. यासाठी नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी दिली.