जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लोकांची गर्दी, कोकण भवनमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 12:15 AM2020-12-24T00:15:50+5:302020-12-24T00:16:14+5:30
Navi Mumbai : ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली होती अशा राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ३० डिसेंबर २०२०पर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय कोकण भवन येथे असून कागदपत्रे सादर करण्यासाठी बुधवारी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाला होता.
ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली होती अशा राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार असून, १५ जानेवारी रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. निवडणूक अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा पावती आवश्यक असल्याने कागदपत्रे पडताळणीसाठी सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमध्ये इच्छुक उमेदवारांसोबत इतरही व्यक्ती आल्याने मोठी गर्दी झाली होती. अनेक नागरिकांनी मास्कचा वापर केला नव्हता. शैक्षणिक प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असल्याने ते मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचीही गर्दी झाली होती. कोरोनाचे सावट असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी विभागाच्या माध्यमातून टोकन क्रमांक देऊन गर्दी न करण्याचे आवाहनदेखील करण्यात येत होते. परंतु नागरिकांनी नियमाचे पालन न करता गर्दी केली होती.
जात प्रमाणपत्र
पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांसोबत आलेल्या इतर व्यक्तींमुळे गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी टोकन प्रकिया राबविण्यात आली असून, विद्यार्थांसाठी वेगळी खिडकी सुरू केली आहे.
- वासुदेव पाटील, उपआयुक्त, जात प्रमाणपत्र पडताळणी,
ठाणे जिल्हा