अलिबाग : मुंबई-पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्याच्या निसर्गरमणीय किनारपट्टीत सध्या समुद्राच्या पाण्याचे उधाण कमी आणि पर्यटकांचीच तुडुंब भरती असे चित्र दिसून येत आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ही गर्दी झाली आहे. रायगडच्या किनारपट्टीतील मांडवा सागरी पोलीस ठाणे, अलिबाग, रेवदंडा, मुरुड, दिघी सागरी पोलीस ठाणे, म्हसळा आणि श्रीवर्धन या आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण पाच हजारांच्यावर हॉटेल्स, रिसॉर्ट, घरगुती निवारे आणि गेस्ट हाऊसेस असून ही सर्व हाऊसफुल्ल झाली असून ठिकठिकाणचे हॉटेल व्यावसायिक आणि पोलीस स्टेशन्सकडून उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्याच्या किनारपट्टीत तब्बल पाच लाखांच्या वर पर्यटक मुक्कामी दाखल झाले आहेत.शनिवारी गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा (अलिबाग)दरम्यानची सागरी प्रवासी बोट वाहतूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवली होती. त्यामुळे मुंबईतील पर्यटक शनिवारी अलिबागेत दाखल होवू शकले नाहीत. परिणामी काही पर्यटकांनी नाराजीव्यक्त केली. रविवारी सकाळपासून गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा (अलिबाग) दरम्यानची सागरी प्रवासी बोट मार्गे सुमारे ४५ हजार पर्यटक मांडवा, आवास, सासवने, थळ, वरसोली, अलिबाग, नागाव, रेवदंडा या किनारपट्टीत दाखल झाले. पावसाळ्यात गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मुंबई-पुण्याच्या रायगडच्या किनारपट्टीत कारने येणाऱ्या पर्यटकांनी चक्क पाठच फिरवली होती. परिणामी किनारपट्टीतील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे थंडावला होता. शुक्रवारपासून पर्यटकांच्या अगमनाने किनारपट्टीतील पर्यटन व्यावसायिक सुखावला असल्याची माहिती पर्यटन अभ्यासक राजेश शिंदे यांनी दिली आहे.पुण्याहून ताम्हाणी घाट मार्गे सुमारे ७००च्यावर कार व बसेस रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, दिवेआगर,मुरुड या किनारपट्टीत दाखल झाल्या आहेत तर वरंध मार्गे महाडला येवून रायगड दर्शन करून पुढे दापोली-हर्णेच्या सागर किनारपट्टीत पोहोचणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटकांचे प्रमाण मोठे असल्याची माहिती श्रीवर्धनमधील सामाजिक कार्यकर्ते मनोज गोगटे यांनी दिली आहे. हरिहरेश्वर हे तीर्थस्थान दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील अनेकांचे ते कुलदैवतही आहे. त्यामुळे देवदर्शनासह पर्यटन असा दुहेरी हेतू ने पर्यटक येत असल्याचे गोगटे म्हणाले.
रायगड समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी
By admin | Published: December 26, 2016 6:23 AM