महाड : राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे रायगड येथे आयोजित केलेल्या रायगड महोत्सवाला पर्यटकांची उत्स्फू र्त प्रतिसाद लाभला असून, शनिवार आणि रविवारी तर पर्यटकांची अलोट गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. पाचाड येथे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीद्वारे शिवकालीन वातावरणनिर्मिती झाल्याचे पाहायला मिळाले. २१ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. दोन दिवस महोत्सवाला अत्यल्प प्रतिसाद लाभला, मात्र शनिवार आणि रविवारी महोत्सवाला पर्यटकांची अलोट गर्दी झाली. शनिवारी सायंकाळी तर कौझर ते पाचाडदरम्यानच्या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. शनिवारी सायंकाळी तर पाचाड येथे उभारण्यात आलेले वाहनतळदेखील फुल झाल्याने वाहने या मार्गावरच उभी करण्यात आली होती. या मार्गावर सुमारे चार ते पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.पाचाड येथील शिवसृष्टी पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली. शस्त्रास्त्र प्रदर्शन, दांडपट्टा, ढालकाठी आदी मर्दानी खेळ पाहण्यासाठी पर्यटकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. जिजामाता वाड्यानजीक उभारलेल्या भव्य व्यासपीठावर सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमालाही हजारो प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. यावेळी सादर करण्यात आलेल्या नाट्यरूपी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जिवंत देखावा पाहून शिवप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फिटले. शिवसृष्टीत वेगवेगळे स्टॉल्सदेखील उभारण्यात आले होते. गडावरदेखील अशाच प्रकारचे जिवंत देखावे सादर करण्यात येत होते. गडावरील सात राण्यांचे महाल, राजदरबार, नगारखाना, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आदी प्रमुख वास्तूंची सजावट करून प्रकाशमय करण्यात आली होती. शिवसृष्टीच्या परिसरात हवेत उडणाऱ्या धुळीमुळे पर्यटक हैराण झाले होते. कांझर ते पाचाड मार्गावर वाहतूककोंडी झाल्यामुळे असंख्य पर्यटकांना येथील रायगड महोत्सवाच्या ठिकाणी पोचण्यासाठी चार ते पाच किमी लांब पायपीट करावी लागली. मात्र त्यावेळी पायपीट करणाऱ्या महिला व अबालवृद्धांचा उत्साहदेखील दांडगा असल्याचे दिसून आले. रोप वेला पाच तास प्रतीक्षा असल्याने अनेक पर्यटकांनी पायी चढत गडावर जाणे पसंत केले. (वार्ताहर)
रायगड महोत्सवाला पर्यटकांची अलोट गर्दी
By admin | Published: January 25, 2016 1:27 AM