पनवेल तहसील कार्यालयात गर्दी वाढली; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
By वैभव गायकर | Published: July 3, 2024 07:11 PM2024-07-03T19:11:44+5:302024-07-03T19:11:50+5:30
या योजनेसाठी लागणारे उत्पन्न आणि रहिवासी दाखले काढण्यासाठी देखील अनेकांनी सेतु केंद्रात मोठी गर्दी केल्याचे चित्र बुधवार दि.3 रोजी पहावयास मिळाले.
पनवेल : शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयात महिलांनी मोठी गर्दी केली. संबंधित योजना तहसील कार्यालयाशी संबंधित नसून महिला व बाल कल्याण विभागाशी संबंधित असल्याने या योजनेचे फॉर्म तहसील कार्यालयातून वितरित केले जाणार नसल्याची माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.
या योजनेसाठी लागणारे उत्पन्न आणि रहिवासी दाखले काढण्यासाठी देखील अनेकांनी सेतु केंद्रात मोठी गर्दी केल्याचे चित्र बुधवार दि.3 रोजी पहावयास मिळाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तरीही चालणार आहे. त्याऐवजी महिलेकडे 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र असल्यास ते ग्राह्य धरले जाणार आहे.
परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मा दाखला किंवा शाळा सोडल्याचा आवश्यक आहे.
संबंधित योजनेचे फॉर्म अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक तसेच पालिका क्षेत्रात वार्ड अधिकारी वितरित करणार आहेत.हि योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी विनाकारण तहसील कार्यालयात गर्दी करू नये.
- विजय पाटील (तहसीलदार,पनवेल)