ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्यासाठी गर्दी; पनवेल पंचायत समिती कार्यालयात कोरोनाचे नियम पायदळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 01:02 AM2020-12-29T01:02:56+5:302020-12-29T01:03:02+5:30
पनवेल पंचायत समिती कार्यालयात कोरोनाचे नियम पायदळी
- वैभव गायकर
पनवेल : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडत आहेत. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सध्याच्या घडीला उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. पंचायत समिती कार्यालयात नेमलेले २४ अधिकारी हे काम पाहत आहेत. मात्र अर्ज भरण्यासाठी अनेक जण शक्तिप्रदर्शन करीत असून मोठ्या प्रमाणात गर्दी पंचायत समिती कार्यालयात होऊन कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत.
३० डिसेंबरपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे. दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान हे फॉर्म भरता येणार आहेत. याकरिता २४ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. कोविड काळात फॉर्म भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन टाळून कमीत कमी १ व जास्तीत जास्त ३ माणसे सोबत आणण्याचे नियम असताना पनवेलमध्ये उत्साही कार्यकर्ते पंचायत समिती कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. शक्तिप्रदर्शन करीत लहान मुलांनादेखील या ठिकाणी आणले जात आहे. या गर्दी दरम्यान मोठ्या प्रमाणात कोविडबाबत घालून दिलेले नियम पायदळी तुडवले जात आहेत.
अनेक जण मास्कचादेखील वापर करीत नसल्याचे पाहावयास मिळत असून प्रशासन बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे. एकीकडे पालिका प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे आदी नियमांचे उल्लंघन केल्यास दंड ठोठावत आहे. मात्र शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते पंचायत समिती कार्यालयासमोर गर्दी करीत असूनदेखील या कार्यकर्त्यांना वेगळे नियम आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. याकरिता उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज महा ई-सेवा केंद्र अथवा अन्य संगणकीय यंत्रणेद्वारे भरून त्याची प्रत काढून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ती जमा करावयाची आहेत. याकरिता जास्तीत जास्त तिघांची उपस्थिती आवश्यक असताना शेकडोंच्या संख्येने गर्दी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर होत आहे. प्रशासनाने आवर घालण्याची गरज आहे.