दिवाळीनिमित्त बाजारात गर्दी; १५० टन फुलांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 11:44 PM2019-10-26T23:44:44+5:302019-10-26T23:45:00+5:30
एक आठवड्यात ६५० टन सुका मेव्याची आवक
नामदेव मोरे
नवी मुंबई : दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पनवेलसह नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी शेतकरी स्वत: फूलविक्रीसाठी आले आहेत. दोन दिवसांमध्ये तब्बल १५० टन फुलांची या परिसरात विक्री होणार आहे. एक आठवड्यामध्ये मुंबई बाजार समितीमध्ये तब्बल ६५० टन सुका मेव्याचीही विक्री झाली असून, ६० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामधील सर्व बाजारपेठेमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
दिवाळीनिमित्त झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. पुणे व नाशिक जिल्ह्यामधील १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी स्वत:च या परिसरामधील विविध ठिकाणी फुलांची विक्री सुरू केली आहे. मुंबईमधील मार्केटमध्ये फुले विक्रीसाठी पाठविली, तर त्याला चांगला बाजारभाव मिळत नाही. अनेक वेळा आवक जास्त झाल्यामुळे बाजारभाव पडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असते. दहा वर्षांपूर्वी मुंबईत फुले विक्रीसाठी गेलेल्या शेतकºयांना चांगला भाव मिळाला नाही, यामुळे काहींनी नवी मुंबईमधील पदपथावर फुलांची विक्री केली व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून पुणे जिल्ह्यातील घोडेगाव व नाशिकमधील शेतकरी स्वत:च फुलांची विक्री करू लागले आहेत.
सद्यस्थितीमध्ये वाशी, सानपाडा, नेरुळ, पनवेल व इतर ठिकाणी १०० पेक्षा जास्त शेतकरी स्वत:च विक्रेते बनले आहेत. यावर्षी तब्बल १५० टन फुलांची आवक या परिसरामध्ये झाली आहे. ७० ते ८० रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री होत आहे. शेतकºयांना चांगला भाव मिळत असून, ग्राहकांनाही स्वस्त दरामध्ये फुले मिळत असल्यामुळे शेतकरी बाजारपेठेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
दिवाळीमध्ये मिठाईची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते; परंतु मागील काही दिवसांमध्ये मिठाईसाठी वापरण्यात येणारा मावा व इतर वस्तूंमध्ये भेसळ झाल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. याशिवाय गोड मिठाई शरीराला घातक असल्यामुळे ग्राहकांकडून सुका मेव्याला अधिक पसंती मिळू लागली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील सहा दिवसांमध्ये रोज सरासरी १०० टन सुका मेव्याची विक्री झाली आहे. तब्बल ६५० टन काजू, बदाम, पिस्ता व आक्रोडची विक्री झाली असून, या माध्यमातून एपीएमसीमध्ये ६० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
बाजार समितीमध्ये बाहेर थेटही मोठ्या प्रमाणात सुका मेव्याची विक्री झाली आहे. एपीएमसी व बाहेरील थेट विक्रीच्या या व्यवसायामधील उलाढाल १०० कोटीपेक्षा जास्त झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. पुढील दोन दिवसांमध्येही सुका मेव्याची उलाढाल मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकºयांमध्ये समाधान
नवी मुंबईमधील वाशी व इतर ठिकाणी पुणे जिल्ह्यामधील मोठ्या प्रमाणात शेतकरी फूलविक्री करण्यासाठी आले आहेत. जवळपास दहा वर्षांपासून अनेक शेतकरी नवी मुंबईमध्ये येत असून पदपथावर व्यवसाय करत आहेत. शेतकºयांना महापालिका प्रशासन व नवी मुंबईकरांकडूनही चांगले सहकार्य होत आहे. फुलांच्या थेट विक्रीतून चांगला मोबदला मिळत असल्यामुळे शेतकºयांनीही समाधान व्यक्त केले आहे.
आरोग्यविषयी जागरूकता
या पूर्वी दिवाळीमध्ये भेट म्हणून मिठाई मोठ्या प्रमाणात दिली जात होती; परंतु मिठाई आरोग्यास घातक असते. २४ तासांमध्ये मिठाई संपविणे आवश्यक असते. मिठाई वेळेत संपली नाही तर ती खराब होण्याची शक्यताही असते. नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढली असल्यामुळे सुका मेव्याला पसंती वाढली असून मिठाईपेक्षा त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.