संचारबंदी उठवताच पनवेलच्या बाजारपेठेत गर्दी; कोरोना साखळी तोडण्याच्या उद्देशाला हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:55 PM2020-07-22T23:55:49+5:302020-07-22T23:55:58+5:30
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; गांभीर्य नाही
कळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वाढत्या संख्येमुळे नागरिकांसह महापलिका प्रशासनाने धसका घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व्हावी आणि पनवेल परिसरातील कोरोनाची साखळी तुटावी, यासाठी पनवेल महापलिका क्षेत्रात १९ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला होता. बुधवारी संचारबंदी उठविल्याने पनवेल येथील मार्केटमध्ये सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
पनवेल महापालिका क्षेत्रातील पनवेल, कळंबोली, नवीन पनवेल, खारघर, कामोठे, तळोजा या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दिवसाला दिडशेच्या जवळपास रुग्ण आढळत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिका क्षेत्रात ३ जुलैपासून १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला. पुढे तो ११ दिवस वाढविण्यात आला होता. रहिवासी, लोकप्रतिनिधी, व्यापारी वर्गातून याचा विरोध होत असल्याने, २४ जुलैला संपणारे लॉकडाऊन दोन दिवस अगोदरच शिथिल करण्याचा निर्णय आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतला.
कंटेन्मेन्ट झोन आणि क्लस्टर कंटेन्मेन्ट झोन वगळता, पनवेल महापालिका क्षेत्रात अनलॉक करण्यात आला आहे. बुधवारी संचारबंदी उठवल्याने पनवेल रोज भाजी मार्केट, उरण नाका, टपाल नाका, लाइन आळी, गणेश मार्केट, कामोठे भाजी मार्केट, गोकुळ डेरी, कळंबोली येथील भाजी मार्केट, करवली नाका या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर, शहरातील पेट्रोल पंप, पिठाची गिरणी, बँक, मोबाइल दुकाने आदी साहित्य खरेसाठी नागरिकांनी मार्केटमध्ये गर्दी केली होती. कित्येत नागरिकांच्या तोंडावर मास्क नव्हते. कोरोना संसर्ग रोगाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे नागरिकांकडून नियमाची पायमल्ली होत आहे.
धोका कायम तरी नागरिक बिनधास्त
बुधवारी झालेल्या गर्दीने प्रशासनाचे सर्वच नियम पायदळी तुडवले. किराणा दुकान, पेट्रोल पंप, भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला, तर कित्येक नागरिक विना मास्क बिनधास्त फिरत होते. यामुळे नागरिकांत कोरोनाबाबत भय उरले नसल्याचे दिसून आले. नागरिक बिनधास्त वावरत आहेत.