कळंबाेली : पनवेलरेल्वे स्थानकाबाहेर शनिवारी गोरखपूर एक्स्प्रेसकरिता रेल्वे परिसरात परप्रांतीयांची गर्दी उसळली होती. गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. काहींच्या तोंडावर मास्क न घातलेले परप्रांतीय रेल्वे परिसर आवारात फिरत होते. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत कोरोनाला आमंत्रण देण्याचे काम यावेळी होत आहे. पनवेल रेल्वे स्थानकातून दिवसाआड गोरखपूर एक्स्प्रेस जात आहे. त्यानुसार पनवेल परिसरातील परप्रांतीय गावी जाण्यासाठी शनिवारी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली होती. दुपारी दीडच्या सुमारास गर्दी उसळल्याने पनवेल रेल्वे स्थानक परिसर परप्रांतीय प्रवाशांनी गजबजला होता. रेल्वे स्थानकाबाहेर तसेच आवारातील इतर जागोजागी आपले सामान घेऊन झाडांच्या सावलीचा आधार घेत थांबले होते. यात महिला, लहान मुलांचा समावेश होता. काहींच्या तोंडावर मास्क नव्हते. त्यात गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याने सामायिक अंतराचे तीनतेरा वाजले. १४ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. मध्यंतरी गावी जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली होती. त्यानंतर शनिवारी गोरखपूर एक्स्प्रेसमधून जाणाऱ्या परप्रांतीय प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. हाताला काम नसल्याने आपल्या स्वगावी जाण्यासाठी कित्येक मजूर, कामगार रेल्वे स्थानक गाठत आहेत.
बिहार, उत्तर प्रदेश जाणाऱ्यांची संख्या मोठीपनवेल, उरण, पेण , अलिबाग , कळंबोली , कामोठे , खारघर , तळोजा एमआयडीसी वसाहत ,शिळफाटा परिसरात काम करणारे बिहार व उत्तर प्रदेशकडील बहुतांश मजूर या परिसरात राहतात. काम बंद असल्याने गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांत वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसाआड गोरखपूर जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी होत आहे.