नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या देखाव्यांमधून सामाजिक संदेश देणाऱ्या वाशी सेक्टर १७ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी उत्तराखंडमधील प्राचीन शिवमंदिराचा देखावा साकारला आहे. मंदिराची आकर्षक प्रतिकृती पाहण्यासाठी पावसातही भाविकांची रांग लागल्याचे पाहवयास मिळते.
या गणेशोत्सव मंडळाकडून दरवर्षी विविध संदेशात्मक देखावे साकारले जातात. आकर्षक मूर्ती व नेत्रदीपक सजावट हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे दहा दिवस भाविकांची येथे मोठी गर्दी असते. वाशी सेक्टर १७ येथील देशभक्त बाबूगेनू क्र ीडांगणात भव्य स्वरूपात या उत्सवाचे आयोजन केले जाते. वाशीचा महाराजा या नावाने या गणेशोत्सवाची ओळख निर्माण झाली आहे. विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखाव्यांमुळे मंडळाला आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उत्सवात स्वच्छता, सामाजिक, धार्मिक एकोपा राखण्यात मंडळाची आग्रही भूमिका असते. मागील काही वर्षांत या मंडळाचा गणपती भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. दर्शनाला येणाºया भक्तांची रिघ वाढत आहे. सोन्या-चांदीचे अलंकार गणरायाला अर्पण केले जात आहेत. यात मुकुट, प्रभावळ, हार, सोंडपट्टा, हातातील तोडे, पायाचा पंजा, पावले, हात, ब्रेसलेट, अंगठी, बाजूबंद, हातांमधील हत्यारे (परशू) आदीचा समावेश आहे. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी भाविकांची आणखी गर्दी होण्याची शक्यता असल्याने मंडळाने पूर्ण नियोजन केले आहे. सुरक्षिततेच्या पुरेपूर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.