कोकणात पर्यटकांची गर्दी; कोरोनाचा पडला विसर, गोवा महामार्ग गजबाजला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 11:36 PM2020-12-30T23:36:41+5:302020-12-30T23:36:48+5:30
कोरोनाचा पडला विसर; गोवा महामार्ग गजबाजला
दासगाव : बुधवारी सकाळपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. एकच दिवसावर आलेल्या थर्टी फर्स्टसाठी कोकण आणि गोव्यामध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची अचानक मुंबई-गोवा महामार्गावर गर्दी झाली होती.
शासनाने कोरोनामुळे थर्टी फर्स्टसाठी जरी निर्बंध घालत संचारबंदी लागू केली असली, तरी मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या वाहनांची गर्दी पाहिली, तर नागरिक मात्र यंदाही कोरोनाला बाजूला ठेवत थर्टी फर्स्ट दरवर्षाप्रमाणेच यंदाही जल्लोषात साजरे करतील, असे दिसून येत आहे.
एकच दिवसावर थर्टी फर्स्ट आला आहे. शासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जेणेकरून गर्दी टाळली जाईल. दरवर्षी थर्टी फर्स्टच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याचप्रमाणे, प्रत्येक राज्य असो, जिल्हा असो, तालुका असो, जल्लोषात थर्टी फर्स्ट साजरा केला जातो. यंदा शासनाने घातलेल्या निर्बंधमुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी होईल, असे वाटत होते, परंतु आजच्या घडीला नागरिकांमध्ये कोरोनाची भीती राहिली दिसून येत नसून, थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा जल्लोष आजही कायम आहे.
राज्यामध्ये कोरोना नियंत्रणात येत असला, तरी ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोनाचे जवळपास वीस रुग्ण देश भरात आढळून आले आहेत. यामुळे देशभरात नवी चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचार बंदी लागू केली आहे. संचारबंदीबरोबर विविध कार्यक्रमांवर निर्बंध लादले आहेत. मात्र, नागरिकांचा कल थर्टी फर्स्टकडे लागला असून, खबरदारीकडे दुर्लक्ष करत मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक कोकण आणि गोवा राज्याकडे वळले आहेत. याचा फायदा व्यावसायिकांना होत असला, तरी कोरोनाच्या प्रसाराबाबत धोकादायक ठरणार आहे.दरवर्षी आम्ही थर्टी फर्स्ट कोकणात येऊन साजरी करतो आता थोडा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलो असून, दरवर्षीप्रमाणेच यंदाही साजरी करणार असल्याचे एका पर्यटकाने सांगितले.