वाशी-बेलापूरच्या पम्पिंग स्टेशनला ‘सीआरझेड’चा हिरवा कंदील
By नारायण जाधव | Published: April 3, 2023 04:37 PM2023-04-03T16:37:53+5:302023-04-03T16:39:12+5:30
जीर्ण वास्तू तोडून नव्याने बांधणार : अंदाजे ७२ कोटी रुपये खर्च अपेक्षित
नारायण जाधव
नवी मुंबई : नवी मुंबई शहर हे नेदरलँडच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे. भरतीच्या वेळी खाडीतील पाणी शहरात घुसू नये, यासाठी शहरात अंतरा-अंतरावर चॅनल काढले आहेत. त्याच धर्तीवर पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास ठिकठिकाणी ‘सिडको’ने होल्डिंग पाँडसह पम्पिंग स्टेशनही बांधली आहेत. यातील वाशी आणि बेलापूर येथील सिडकोकालीन जुने पम्पिंगचे बांधकाम तोडून त्या जागी नवे पम्पिंग बांधण्यास ‘सीआरझेड’ प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. यामुळे नवी मुंबई महापालिकेस मोठा दिलासा मिळाला आहे.
या कामावर अंदाजे ७२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी ‘लोकमत’ला दिली. ‘सीआरझेड’ प्राधिकरणाच्या अटीनुसार मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घेऊन दोन्ही कामांच्या निविदाप्रक्रिया पूर्ण करून कामास सुरुवात करण्यात येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केेले.
वाशी सेक्टर सेक्टर ८ मधील सर्व्हे क्रमांक १७ वर नऊ हजार चौरस मीटरचे पम्पिंग स्टेशन आहे. बेलापूर सेक्टर १२ मधील सर्व्हे क्रमांक ४६६ ए भूखंडावरील पम्पिंग स्टेशनचा एरिया सर्वांत मोठा म्हणजे १६ एकर इतका आहे. बेलापूरच्या पम्पिंग स्टेशनचे क्षेत्र मोठे असण्याचे कारण म्हणजे या पम्पिंग स्टेशनमध्ये सेक्टर १ ते ९ सह सेक्टर ११, १२ मधील पाणीही जमा होते.
जीएसटीमुळे खर्च वाढला
वाशीच्या पम्पिंग स्टेशनच्या बांधकामासाठी ३२ कोटी, तर बेलापूरच्या पम्पिंग स्टेशनच्या बांधकामावर ४० कोटी खर्च अपेक्षित आहे. सध्या याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र सागरकिनारा प्राधिकरणाच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. प्राधिकरणाची फेब्रुवारी महिन्यातील नियोजित १६३ वी बैठक मार्चमध्ये झाली. तीत ही मंजुरी आहे. १८ टक्के जीएसटी आणि इतर गोष्टींमुळे खर्चात वाढ झाली आहे.
या बांधकामांचा आहे समावेश
वाशी आणि बेलापूरच्या पम्पिंग स्टेशनचे बांधकाम सिडकोकालीन असून, कालौघात ते अतिशय जुने आणि जीर्ण झालेले आहे. यामुळे अपघात होण्याची भीती आहे. यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी दोन्ही पम्पिंग स्टेशनचे बांधकाम नव्याने करण्यात येणार आहे, त्यामध्ये जुनी प्लीन्थ तोडून नव्याने बांधणे, भिंतींचे बांधकाम करणे, इलेक्ट्रिकल कामांसह सर्व मशिनरी नव्याने बसविण्यात येणार आहे. यामुळे दोन्ही पम्पिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील, असा आशावाद शहर अभियंता संजय देसाई यांनी व्यक्त केला.