भारत महोत्सवातून सांस्कृतिक मेजवानी
By admin | Published: January 19, 2016 02:23 AM2016-01-19T02:23:26+5:302016-01-19T02:23:26+5:30
ऐरोली येथील भारत महोत्सवाची सांगता विविध राज्यांच्या पारंपरिक नृत्यांनी झाली. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून नवी मुंबईकरांनी
नवी मुंबई : ऐरोली येथील भारत महोत्सवाची सांगता विविध राज्यांच्या पारंपरिक नृत्यांनी झाली. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून नवी मुंबईकरांनी सांस्कृतिक देशभ्रमंतीचा आनंद लुटला, तर अमृता खानविलकर, हेमांगी कवी अशा कलाकारांनी महोत्सवाला भेट देवून प्रेक्षकांच्या उत्साहात अधिकच भर टाकली.
ऐरोली सेक्टर ८ येथील विब्ग्योर शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या तीन दिवसीय भारत महोत्सवाची सांगता रविवारी मोठ्या उत्साहात झाली. प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ठाणे लोकसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते. नवी मुंबईला स्मार्ट सिटी अशी नवी ओळख निर्माण होत आहे. अशावेळी शहरात वास्तव्य असलेल्या सर्वधर्मीयांना इतरांच्याही संस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून झाला. एकवीरा देवीची भव्य पालखी काढून सुरवात झालेल्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विठ्ठल उमप थिएटर्स प्रस्तुत ‘मी मराठी‘ या कार्यक्रमातून नंदेश उमप व कलाकारांनी गायलेल्या गाण्यांचा आनंद प्रेक्षकांनी घेतला, तर दुसऱ्या दिवशी संतोष चौधरी ऊर्फ दादुस याने गायलेल्या आगरी कोळी गाण्यांवर प्रेक्षकांनी ताल धरला होता. पहिल्या दोन दिवसांच्या भरगच्च प्रतिसादानंतर तिसऱ्या दिवशीही प्रेक्षकांनी अलोट गर्दी करत महोत्सवाची शोभा वाढवली. रविवारी महोत्सवाच्या तिसरी दिवशी महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक नृत्याच्या माध्यमातून भारतातील विविध राज्याची संस्कृती प्रेक्षकांपुढे मांडण्यात आली. रुद्राक्ष डान्स अॅकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेली ही कलाकृती प्रेक्षकांना थक्क करणारी होती. गुजरात, आसाम, छत्तीसगड, मध्यप्रदेश व अनेक राज्यांमधील पारंपरिक नृत्ये उपस्थितांना प्रथमच पहायला मिळाली. तर आगरी संस्कृतीला आधुनिक तडका देत महिलांनी सादर केलेले नृत्य तर प्रेक्षकांना अधिकच भावले. अभिनेत्री अमृता खानविलकर, हेमांगी कवी व संजीवनी जाधव यांनी उपस्थित राहून प्रेक्षकांच्या उत्साहात अधिकच भर टाकली. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे, युवा नेते वैभव नाईक, प्रकल्पग्रस्तांचे नेते राजेश पाटील, उपआयुक्त बाबासाहेब राजळे, नगरसेविका पूनम पाटील, हेमांगी सोनवणे आदींनी महोत्सवाला भेटी दिल्या. महोत्सवातून नागरिकांची सांस्कृतिक भूक भागल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. प्रसिध्द कवी अरुण म्हात्रे यांच्या कवितांनाही भरभरुन दाद मिळाली. यावेळी राजाराम पाटील यांनी आगरी कोळी संस्कृतीचा उलगडा करत महिलांच्या सध्याच्या समाजातील स्थानाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. यावेळी सँड आर्टिस्ट राहुल आर्य यांनी वाळूवर तयार केलेल्या कलाकृतीमधून प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी उभारलेल्या लढ्याचे चित्र प्रेक्षकांपुढे मांडले. लकी ड्रॉमध्ये भास्कर खैरनार यांनी सफारी तर आशा सुतार, साक्षी पाटील यांनी पैठणी पटकावली. (प्रतिक्रिया)
अस्मानी संकट व कर्जाचा बोजा असह्य झाल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या मुलांपुढेही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यापैकी १०० शेतकरी कुटुंबांना बीडचे प्राध्यापक यशवंत गोस्वामी यांनी दत्तक घेतलेले आहे. त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देत महोत्सवादरम्यान प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते गोस्वामी यांना ५० हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात आला. यावेळी कदम व गोस्वामी यांनीही अनिकेत म्हात्रे यांच्या समाजोपयोगी उपक्रमाला दाद दिली.नवी मुंबईत अनेक महोत्सव होत असताना ते केवळ ठरावीक वर्गासाठी मर्यादित असतात. मात्र नवी मुंबई या आधुनिक शहरात देशातील विविध राज्यातील नागरिकांचे वास्तव्य आहे. राज्यातील पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडावे या उद्देशाने हा भारत महोत्सव आयोजित केला होता.
- अनिकेत म्हात्रे, ठाणे लोकसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष.