नवी मुंबई : महापालिकेच्या माध्यमातून वाशी सेक्टर ९ मध्ये उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व कला केंद्राच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षे या वास्तूची डागडुजी न झाल्याने भिंतीला तडे गेले आहेत, तर ठिकठिकाणी प्लास्टर निखळून खिडक्यांचे लोखंडी ग्रील निखळून पडले आहे. त्यामुळे त्याचा ताबा मद्यपी आणि गर्दुल्ल्यांनी घेतला आहे.महापालिकेने २0१0 मध्ये लाखो रुपये खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दर्शनी भागात ही वास्तू उभारली आहे. या परिसरात आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. त्यामुळे विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमासाठी या वास्तूचा वापर केला जातो, परंतु वास्तू उभारल्यापासून एकदाही तिची डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे इमारतीची दुरवस्था झाली आहे. रात्रीच्या वेळी गर्दुल्ले आणि मद्यपींनी या वास्तूचा ताबा घेतला आहे. त्यामुळे रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीबरोबरच मैदानाचीही दयनीय अवस्था झाली आहे. मैदानात मोठमोठे खड्डे पडले आहेत. कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यासंदर्भात भारिप बहुजन महासंघाचे कार्याध्यक्ष प्रदीप बी. वाघमारे यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाला पत्र दिले असून, सांस्कृतिक केंद्राची व उद्यानाची तातडीने डागडुजी करण्याची मागणी केली आहे.विशेष म्हणजे महापालिकेने शहरातील सांस्कृतिक व कला केंद्र, तसेच समाज मंदिराची डागडुजी व रंगरंगोटीचे काम हाती घेतले आहे. मागील तीन महिन्यांत शहरातील अनेक कला केंद्र आणि समाज मंदिराची दुरुस्ती करण्यात आली, परंतु वाशी सेक्टर ९ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व कला केंद्राच्या इमारतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने याप्रकरणी तातडीने लक्ष घालून केंद्राच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी त्यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे केली आहे. महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार व वाशी विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रदीप वाघमारे यांच्यासह भारिप बहुजन महासंघाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भूषण कासारे, नवी मुंबईचे उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, बुद्ध प्रतिष्ठानचे अध्यक्ष कारभारी केदारे व सचिव रमेश गांगुर्डे उपस्थित होते.
वाशीतील सांस्कृतिक केंद्राची दुरवस्था, मद्यपी आणि गर्दुल्ल्यांचा वावर; उद्यानाचीही झाली दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 2:44 AM