गूळवेल ठरतेय आजारांत गुणकारी! मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 12:21 AM2021-05-06T00:21:51+5:302021-05-06T00:22:10+5:30
जव्हार, मोखाडा भागांत गूळवेल सहज उपलब्ध होते. गूळवेल ही वनस्पती शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करीत असल्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक कुटुंबांनी गूळवेलचा काढा घेण्यास पसंती दिली आहे
हुसेन मेमन
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : पालघर जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना जव्हार, मोखाडासारख्या ग्रामीण भागांसह शहरातही गूळवेल (अमृतवेल) या वनस्पतीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. अनेक आजारांवर ही वेल ‘अमृतवेल’ ठरत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले
गूळवेलचा काढा सेवन केल्याने ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, थंडी, मळमळ, मूळव्याध, सांधेदुखी, आम्लपित्त, कावीळ, पोटदुखी, मधुमेह आटोक्यात येतो, असे सांगितले जात आहे. त्याप्रमाणे डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू या आजारांवरही गूळवेल गुणकारी असल्यामुळे शहरातील असंख्य कुटुंबांकडून त्याची मागणी होत आहे.
जव्हार, मोखाडा भागांत गूळवेल सहज उपलब्ध होते. गूळवेल ही वनस्पती शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करीत असल्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक कुटुंबांनी गूळवेलचा काढा घेण्यास पसंती दिली आहे. ग्रामीण भागात कडुनिंबाच्या झाडावर व आंब्याच्या झाडावर गूळवेल ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत असते. कडुनिंबाच्या झाडावरील गूळवेलला मोठी मागणी आहे. या वेलीची ओळख ग्रामीण भागातील जाणकार व्यक्तींनाच आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून अनेक कुटुंबे गूळवेल काढ्याचे सेवन करीत आहेत. काही जण या वेलीचे छोटे तुकडे करून रात्री पाण्यात भिजत ठेवतात. सकाळी उपाशीपोटी या पाण्याचे सेवन करतात. तर, काही कुटुंबे या वेलीचे तुकडे पाण्यात टाकून ते पाणी उकळून पितात. गूळवेल हा एक रानभाजीचा प्रकारही मानला जातो.
गूळवेलीचे फायदे
प्रतिकारशक्ती वाढते. ताप कमी होतो. मलेरिया, टायफॉइड आजारांवर फायदेशीर असून पोटाच्या समस्या दूर होतात. मधुमेहावर गुणकारी असून दमा, खोकला आणि कफ कमी होतो. लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते. दरम्यान, तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ही गूळवेल घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
माझ्या घराच्या अंगणात गूळवेल उपलब्ध आहे. त्याचा फायदा आम्ही नेहमी घेतो. ही खूप गुणकारी वेल असून परिसरात नागरिक या वेली आमच्याकडून घेऊन जातात. याचा त्यांना खूप फायदा होतो. - धम्मा लांडे, मोखाडा