साथीचे रोग नियंत्रणात असल्याचा दावा

By admin | Published: September 8, 2016 03:23 AM2016-09-08T03:23:18+5:302016-09-08T03:23:18+5:30

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी साथीचे रोग नियंत्रणात असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. असे असले तरी वाशी, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे व ऐरोली या खाडीकिनाऱ्यालगत असणारी गावे

Cure diseases are under control | साथीचे रोग नियंत्रणात असल्याचा दावा

साथीचे रोग नियंत्रणात असल्याचा दावा

Next

नवी मुंबई : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी साथीचे रोग नियंत्रणात असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. असे असले तरी वाशी, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे व ऐरोली या खाडीकिनाऱ्यालगत असणारी गावे व सिडको वसाहतीतून साथीच्या रोगांनी तोंड वर काढले आहे. त्यामुळे ऐन उत्सव काळात नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरी सुविधांवर विशेष भर दिला आहे. त्यानुसार साथीच्या रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात डासांची उत्पत्ती स्थळे शोधून ती नष्ट करणे, फवारणी, धुरीकरण तसेच जनजागृती आदी उपक्रमांचा समावेश आहे. त्यामुळे यावर्षी मलेरिया व डेंग्यू नियंत्रणात राहिल्याचा दावा महापालिकेच्या संबंधित विभागाकडून करण्यात आला आहे. असे असले तरी शहरातील अनेक वसाहतीतून डासांचा उपद्रव जाणवू लागला आहे. त्यामुळे डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका कोपरखैरणे विभागाला बसला आहे. विशेषत: येथील सेक्टर ४२ येथील नागरी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा संपूर्ण प्रभाग खाडी किनाऱ्यावर असल्याने येथे बारा महिने डासांचा उपद्रव जाणवतो. स्थानिक नगरसेवक देविदास हांडे-पाटील यांनी यासंदर्भात वारंवार आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु कोणत्याही ठोस उपायोजना करण्यात आल्या नाहीत. सध्या तर या विभागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील सेक्टर १६ मध्ये बैठ्या घरांची मोठ्या प्रमाणात वाढीव बांधकामे सुरू आहेत. ठिकठिकाणी डेब्रिजचे ढीग पडले आहेत. त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. याचा परिणाम म्हणून साथीच्या रोगांची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. या परिसरातील प्रत्येक घरात हिवतापाचे रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात ही परिस्थिती निर्माण झाल्याने रहिवाशांत घबराट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक देविदास हांडे-पाटील यांनी मंगळवारी रात्री परिसरातील परिस्थितीची महापालिका आयुक्तांना माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारे आयुक्तांनी बुधवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना या परिसरात पाठवून सद्यस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत परिस्थिती गंभीर असल्याचे आढळून आले. त्यामुळे तातडीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्याचे नगरसेवक हांडे-पाटील यांनी सांगितले. 

Web Title: Cure diseases are under control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.