नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय हद्दीतून तडीपार केल्यानंतरही पुन्हा शहरात आलेल्या सराईत गुन्हेगाराला सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे. तो शिरवणेचा राहणारा असून, नशा करून नागरिकांना मारहाण केल्याचे त्याच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. परंतु तडीपारीची कारवाई केल्यानंतरही पोलिसांना चकमा देवून तो सीबीडी परिसरात आला होता.भूषण कमलाकर सुतार (२५) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव असून तो शिरवणेचा राहणारा आहे. त्याला नशेचे व्यसन जडलेले असल्याने तो नेहमी गांजा किंवा इतर अमली पदार्थांचे सेवन करायचा. मात्र व्यसन केल्यानंतर तो परिसरातील सामान्य नागरिकांना त्रास द्यायचा. दारूच्या बाटल्या फेकून मारणे, शिवीगाळ करणे अशा प्रकारामुळे शिरवणेत त्याची दहशत निर्माण झाली होती. याप्रकरणी त्याच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल आहेत. यामुळे त्याला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातून तडीपार करण्यात आले होते. या कारवाईनुसार पोलिसांचे एक पथक त्याला लोणावळा येथे सोडून आले होते. परंतु त्याला हद्दीबाहेर सोडण्यासाठी गेलेले पथक माघारी येण्यापूर्वी तो परत नवी मुंबईत पोचला होता. याची माहिती सीबीडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांना मिळाली होती. यानुसार वरिष्ठ निरीक्षक मीरा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजपूत यांच्या पथकाने बेलापूर व आग्रोळी परिसरात ठिकठिकाणी सापळा रचला होता. यावेळी सीबीडी सेक्टर ११ येथील सरोवर विहार परिसरातून सुतार याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने तडीपार केल्यानंतर शहरात परत आल्यानंतर एक घरफोडी व एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा केल्याची देखील कबुली दिली. त्यानुसार चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलिसांची नजर चुकवत बेलापूर परिसरात वावरत असताना त्याने पारसिक हिल येथील एका घरामध्ये घरफोडी केली होती. तर त्याठिकाणावरून परत येत असताना मोटारसायकल चोरली होती. (प्रतिनिधी)
तडीपार गुन्हेगाराला सीबीडीमधून अटक
By admin | Published: February 20, 2017 6:38 AM