नामदेव मोरे, नवी मुंबईमहापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयामधील बायोमेट्रिक हजेरीचे मशिन एक वर्षापासून बंद आहेत. मशिन दुरुस्त करण्याकडे किंवा नवीन मशिन घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कर्मचाऱ्यांमधील बेशिस्तपणा वाढत असल्यामुळेच बायोमेट्रिक हजेरीला विरोध केला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. रुग्णालयातील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एक्स-रे व सोनोग्राफी तपासणीसाठीही एक ते दोन दिवस वाट पाहावी लागत आहे. डायलिसिस विभागात ५० रुग्ण प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. ट्रॉमा सेंटरपासून आयसीयू विभागही हाऊसफुल्ल झाला आहे. रुग्णालयामध्ये कायम व कंत्राटी स्वरूपात जवळपास ५०० कर्मचारी काम करत आहेत. कायम कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, वेळेवर कामावर यावे व कामाचे तास पूर्ण करावे यासाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू केली होती. महापालिका मुख्यालयामधील कर्मचाऱ्यांचे पगार याच हजेरीद्वारे काढले होते. आबासाहेब जऱ्हाड आयुक्त असताना त्यांनी सर्व विभागांना त्यांच्या कार्यालयामध्ये बायोमेट्रिक हजेरी मशिन बसवून घेण्याचे आदेश दिले होते. त्यांना ३० हजार रुपये खर्चाचे अधिकारही दिले होते. परंतु महापालिकेच्या रुग्णालयामधील बायोमेट्रिक हजेरी मशिन एक वर्षापासून बंद आहेत. प्रवेशद्वारावर जवळपास तीन मशिन बसविण्यात आल्या असून सर्व मशिन बंद अवस्थेमध्ये आहेत. पालिका रुग्णालयामधील कर्मचारी वेळेवर येतात का, कामावर आल्यानंतर रुग्णांना सेवा देण्यासाठी पूर्णवेळ काम करतात का, यावर कोणाचेही निर्बंध राहिलेले नाहीत. काही कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. बायोमेट्रिक हजेरी सुरू झाल्यास कामावर आल्याची व गेल्याची अचूक नोंद होऊ शकते. परंतु अनेक कर्मचाऱ्यांना ही अचूकता नको असल्यामुळे बायोमेट्रिक हजेरी सुरू केली जात नसल्याचे बोलले जात आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.
रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना शिस्तीचे वावडे
By admin | Published: August 06, 2015 12:40 AM