बँकेच्या लॉकरमधून उडवले ग्राहकांचे दागिने; संशयित सफाई कामगारावर गुन्हा दाखल
By सूर्यकांत वाघमारे | Published: October 12, 2023 05:45 PM2023-10-12T17:45:24+5:302023-10-12T17:45:36+5:30
एपीएमसीमधील प्रकार
नवी मुंबई : एपीएमसीमधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकर मधून दोन ग्राहकांचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. १० लाख ९० हजार रुपये किमतीचे हे दागिने आहेत. याप्रकरणी बँकेत सफाई काम करणाऱ्यावर संशय असल्याने त्याच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एपीएमसी फळ मार्केट मधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत हा प्रकार घडला आहे. बँकेकडून वेळोवेळी लॉकरचे ऑडिट करून त्यामधील दागिन्यांची खातरजमा केली जाते. मार्च महिन्यात देखील असे ऑडिट झाले असता एका लॉकर मधील दोन ग्राहकांचे १० लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले नाहीत. सदर ग्राहकांनी ते दागिने बँकेकडे गहाण ठेवून कर्ज घेतले होते. त्यानुसार हा लॉकर बँकेकडून ग्राहकांचे गहाण ठेवलेले दागिने ठेवण्यासाठी वापरले जात होते.
बँक अधिकारी व ग्राहक यांच्या व्यतिरिक्त बँकेत सफाई काम करणाऱ्याचे त्याठिकाणी येणे जाणे असायचे. शिवाय त्याने यापूर्वी ग्राहकांच्या एफडी पावत्या देखील चोरल्या होत्या. परंतु ग्राहकांनी आपसात प्रकरण मिटवल्याने बँकेने त्यावर आक्षेप घेतला नव्हता. यामुळे त्यानेच लॉकरच्या चाव्या मिळवून त्यामधील दागिने चोरल्याचा संशय बँक अधिकाऱ्यांना आहे. याबाबत त्यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.