जुन्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांची गर्दी जैसे थे
By admin | Published: November 18, 2016 04:01 AM2016-11-18T04:01:25+5:302016-11-18T03:58:54+5:30
शहरातील बँका, एटीएम केंद्र, पोस्ट कार्यालये, वीजभरणा केंद्र आदी ठिकाणी ग्राहकांच्या भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत.
नवी मुंबई : शहरातील बँका, एटीएम केंद्र, पोस्ट कार्यालये, वीजभरणा केंद्र आदी ठिकाणी ग्राहकांच्या भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. नोटबंदीच्या निर्णयाला आठवडा उलटूनही परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून येते. लग्नसराईला सुरुवात झाली असून लग्नखर्चासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी, तसेच नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने इतर कामे अपूर्ण राहत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. कामाची वेळ वाढवली असून दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत असल्याची तक्रार बँक कर्मचाऱ्यांनी केली.
आॅफिसला दांडी मारून पैशांची अडचण दूर करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बँकेचे शटर उघडण्यापूर्वीच बाहेर भली मोठी रांग लावल्याचे चित्र पाहायला मिळते. नोटबंदीविषयी ग्राहकांना असलेल्या शंका दूर करण्यासाठी दुपारच्या जेवणाच्या वेळेतही कपात करण्यात आल्याची माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. कामाचे तास वाढवूनही पुरेसा वेळ मिळत नसल्याची प्रतिक्रिया बँक आॅफ इंडियाचे कर्मचारी जयेंद्र त्रिपाठी यांनी दिली. (प्रतिनिधी)