तुर्भेत तलवारीने केक कापणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 01:37 AM2021-01-13T01:37:47+5:302021-01-13T01:37:55+5:30
व्हायरल फोटोच्या आधारे गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्यांविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी झालेल्या या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याआधारे पोलिसांनी दोघा भावंडांसह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तुर्भे एमआयडीसी परिसरातील डी. आर. पाटील कॉरी येथे रविवारी रात्री हा प्रकार घडला होता. अविनाश भवाळेने (३०) तुर्भेत त्याचा वाढदिवस काही मित्रांसोबत साजरा केला होता. या वेळी केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करण्यात आला होता. शिवाय तिथे उपस्थित असणाऱ्यांनी या कृत्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्याबाबत तुर्भे एमआयडीसी पोलिसांना सोमवारी माहिती मिळाली होती. पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता रविवारी रात्री डी. आर. पाटील कॉरी या ठिकाणी प्रकार घडल्याचे समोर आले. त्यानुसार अवैधरीत्या शस्त्राचा वापर व कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अविनाश भवाळे याच्यासह इतर ५ ते ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वीदेखील नवी मुंबईत असे प्रकार घडले आहेत. तलवारीने केक कापून शक्तिप्रदर्शनाचे काम मित्र मंडळांच्या आडून होत आहे. परिणामी, आगामी काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.