ऐरोलीत पन्नासपेक्षा अधिका झाडांची कत्तल; रबाळे पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:30 PM2020-08-26T23:30:24+5:302020-08-26T23:30:28+5:30
वृक्षप्रेमींमध्ये संतापाची लाट; कारवाईची मागणी
अनंत पाटील
नवी मुंबई : ‘सुंदर नवी मुंबई, स्वच्छ नवी मुंबई’ शहराचे स्वप्न साकार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्चून वृक्षांची लागवड करण्यात आली आहे, परंतु या वृक्षांचे संवर्धन व त्यांची होणारी कत्तल रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसल्यामुळे झाडांची कत्तल होत आहे. ऐरोली सेक्टर १५ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात ५० हून अधिक वृक्षांची कटर मशीनच्या साहाय्याने कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत वृक्षप्रेमींनी असंतोष व्यक्त केला आहे.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तिंच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐरोली सेक्टर १५ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ ऐरोली - मुलुंड मार्गाला लागूनच रस्त्याच्या बाजूला महापालिकेच्या वतीने सुशोभीकरण करून गार्डन उभारले आहे. काही वृक्षप्रेमींनी महापालिकेच्या याच उद्यानासमोर झाडे लावली होती, परंतु या झाडांच्या संवर्धनाबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून ५० हून अधिक झाडांची कत्तल के ली आहे. रात्रीच्या वेळी हा प्रकार घडत असल्याचे वृक्षप्रेमींचे म्हणणे आहे.
नियमानुसार, वृक्षतोड करताना पालिकेच्या वृक्षतोड प्राधिकरणाकडून रीतसर परवानगी घेणे, वृक्ष समितीची मान्यता घेणे, सर्व्हे करून वृक्ष तोडण्याची खरेच गरज आहे का, हे तपासून पाहणे आवश्यक असते. मात्र, पालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. वृक्षप्रेमी ममता महाराणा यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच, त्यांनी वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. नवी मुंबई महापालिकेचे ऐरोली उद्यान विभागाचे सहायक अधिकारी प्रशांत उरणकर यांनी रबाळे पोलिसांत तक्रार केल्यानंतर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.